विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
कोरोना उपचारानंतर उदभवणाऱ्या म्युकोरमायकोसिस या आजारावरील अॅम्फोटेरेसिन बी या इंजेक्शनबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्याची माहिती केंद्रीय रसायन व खते मंत्री मनसुख मांडविय यांनी दिली आहे. सद्यस्थितीत या इंजेक्शनचा प्रचंड तुडवडा आहे. मोठ्या प्रमाणात या आजाराचे रुग्ण समोर येत आहेत. देशातील जवळपास ८ राज्यांमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. तसेच, एका रुग्णालाच हे इंजेक्शन अधिक प्रमाणात द्यावे लागतात. त्यामुळे सद्यस्थितीत या इंजेक्शनचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. याची दखल घेऊनच या इंजेक्शनचे उत्पादन वाढविण्यासाठी येत्या ३ दिवसात आणखी ५ फार्मा कंपन्यांना परवानगी दिली जाणार आहे. त्यामुळे या इंजेक्शनचा पुरवठा वाढणार आहे. असे मांडवीय यांनी स्पष्ट केले आहे. सध्या भारतात ६ कंपन्या हे इंजेक्शन उत्पादित करतात. आता आणखी ५ कंपन्यांना परवाना मिळेल. त्यामुळे देशात एकूण ११ कंपन्यांकडून या इंजेक्शनची निर्मिती होईल. त्यातून मागणी आणि पुरवठा यांचे संतुलन साधले जाईल, असा विश्वास मांडवीय यांनी व्यक्त केला आहे.