विशेष प्रतिनिधी, नाशिक
शहरासह उत्तर महाराष्ट्र्रातील शासकीय रुग्णालयांमध्ये म्युकरमायकोसिस आजाराने बाधित रुग्णसंख्या अधिक आहे. याशिवाय खासगी रुग्णालयांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात रुग्ण दाखल आहेत. त्यात जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून मिळणारी आकडेवारी आणि प्रत्यक्षात विविध खासगी रुग्णालयातील उपचार घेत असलेल्या रुग्णांची आकडेवारी लक्षात घेता यात मोठ्या संख्येने तफावत आहे. म्युकरमायकोसिस आजाराने बाधित रुग्णांवरील उपचारासाठी महत्त्वाचे असलेले इंजेक्शन ॲम्फोटेरिसिन-बी याचा होणारा पुरवठा हा अत्यल्प असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांनी व काही डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने खासदार हेमंत गोडसे यांची भेट घेवून ही समस्या लक्षात आणून दिली. आज रोजी आरोग्य विभागाकडून केवळ म्युकरमायकोसिसचे ३९ रुग्ण असल्याची माहिती विभागाला देण्यात आली आहे. मात्र खासगी रुग्णालयांमध्ये ९८ रुग्ण उपचार घेत आहे. त्यांची माहिती कळविण्यात न आल्यामुळे काल झालेला ॲम्फोटेरिसिनचा साठा हा अत्यल्प होता. सर्व रुग्णांची माहिती कळविणे अत्यंत गरजेचे असल्याचे गोडसे यांनी म्हटले आहे.
नाशिक शहरासह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या काहीशा प्रमाणात कमी होतांना दिसत असली तरी म्युकरमायकोसिस आजाराने डोके वर काढले आहे. या आजाराने बाधितांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. याची गंभीर दखल घेवून खासदार हेंमत गोडसे यांनी आज बुधवारी अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त दा.रा.गहाणे यांची प्रत्यक्ष भेट घेतली. जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून म्युकरमायकोसिस आजाराने बाधित रुग्णांची उपलब्ध आकडेवारी आणि जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची आकडेवारी यात मोठी तफावत असल्याचे लक्षात आणून देत जिल्ह्यातील रुग्णांसाठी ॲम्फोटेरिसिन इंजेक्शनचा साठा तातडीने वाढविण्यात यावा, अशी आग्रही मागणी खा. गोडसे यांनी अन्न व औषध प्रशासनाकडे केली.
नाशिक शहरासह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. गेल्या आठवडाभरापासून कोरोना बाधितांची संख्या काही अंशी कमी होतांना दिसत आहे. कोरोना बाधितांची संख्या ओसरत असतांना म्युकरमायकोसिस आजाराने डोके वर काढले आहे. दिवसागणिक या आजाराने बाधितांची संख्या वाढत चालली आहे.
खा. गोडसे यांनी म्युकरमायकोसिस या आजाराने बाधितांच्या समस्येची तात्काळ दखल घेवून आज मुंबई येथे जावून औषध प्रशासनाचे सहआयुक्त दा.रा.गहाणे यांची भेट घेतली. यावेळी एल.डी. पिंटो यादेखील उपस्थित होत्या. जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून म्युकरमायकोसिस आजाराने ग्रस्त रुग्णांची मिळणारी आकडेवारी आणि प्रत्यक्षात असलेल्या रुग्णांची संख्या यात मोठी तफावत असल्याचे खा. गोडसे यांनी गहाणे यांच्या लक्षात आणून देत ॲम्फोटेरिसिन-बी इंजेक्शनचा पुरवठा तातडीने वाढविण्याची आग्रही मागणी केली. जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून फक्त शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या आकडेवारीची माहिती शासनाला दिली जाते. त्यामुळे शासनाकडून मर्यादित इंजेक्शनचा पुरवठा होत आहे. जिल्हा आरोग्य प्रशासनाने सरकारी तसेच विविध खासगी रुग्णालयांमध्ये दाखल म्युकरमायकोसिस रुग्णांची सविस्तर माहिती सादर केल्यास ॲम्फोटेरिसिन-बी इंजेक्शनचा साठा वाढवून मिळणार आहे. दरम्यान खा. गोडसे यांची मागणी न्यायिक असल्याने लवकरच म्युकरमायकोसिस वरील उपचारासाठी ॲम्फोटेरिसिन-बी इंजेक्शनचा पुरवठा वाढविण्यात येणार असल्याची ग्वाही गहाणे यांनी खा. गोडसे यांना दिली.
इंजेक्शनचा कोटा वाढणार
नाशिक शहरासह उत्तर महाराष्ट्रात म्युकरमायकोसिस आजाराने बाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्या तुलनेत होणारा ॲम्फोटेरिसिन-बी इंजेक्शनचा कोटा कमी असल्याने अन्न व औषध प्रशासनाशी चर्चा करुन कोटा वाढविण्या संदर्भात मागणी केली आहे. लवकरच संबंधित कंपनीकडून म्युकरमायकोसिस आजारावरील उपचारासाठी इंजेक्शनचा कोटा वाढविण्यात येणार असल्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे.
हेमंत गोडसे, खासदार