विशेष प्रतिनिधी, मुंबई
पर्यटनस्थळी गेल्यावर तरूणाईला सेल्फीचा मोह आवरता येत नाही. मात्र, सेल्फी घेण्याच्या नादात अनेक तरूणांना आपले प्राण गमवावे लागलेल्याच्या घटनाही यापूर्वी घडलेल्या आहेत. त्यामुळे पर्यटनस्थळी सेल्फी घेताना नागरिकांनी काळजी घ्यावी, अशा सूचना शासनाच्या पर्यटन विभागातर्फे देण्यात आल्या आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षापासून पर्यटनस्थळे बंद आहेत. मात्र, असे असताना देखील काही उत्साही तरूण नियमांचे उल्लंघन करून पर्यटनस्थळांवर जाताना दिसत आहेत. त्यामुळे प्रशासनाने अशा पर्यटनस्थळांवर कोठे सेल्फी काढायचे आणि कोठे नाही, याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. या अतिउत्साही पर्यटकांवर जरब बसविण्यासाठी प्रशासनाकडून स्थानिक पोलिसांचे सहकार्य घेण्यात येत आहे. सेल्फी पॉइंटच्या ठिकाणी होणारे अपघात टाळण्यासाठी तेथे माहिती फलक लावण्यात येणार आहेत अशी माहिती, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी दिली.