मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एस.टी.ला महाराष्ट्र राज्याची रक्तवाहिनी समजले जाते. गाव तेथे एसटी या धोरणाचा अवलंब करीत सर्वसामान्य नागरिकांसाठी प्रवासाची सोय महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ करत असते. त्यात कालानुरूप बदल होत गेले आहेत, राज्य परिवहन महामंडळ अर्थात आपली लालपरी पुन्हा एकदा वातानुकूलीत एस. सी. स्लीपर सेवा सुरु करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. खासगी ट्रॅव्हल्सची या क्षेत्रातील मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी ही बाब महत्त्वाची ठरणार आहे.
यापूर्वी एसटी महामंडळाने हा प्रयोग राबविला होता. पण भाडे अधिक असल्याने प्रवाशांनी ही सेवा नाकारली होती. त्यानंतर महामंडळाने भाड्यात कपात करत प्रवाशांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यात लालपरीला काही यश आले नाही. महाराष्ट्राची राज्याची स्थापना झाली आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा सुरळीत कारभार राज्यात सुरू झाला. राज्यातील पहिली एसटी बस १९४८ मध्ये नगर ते पुणे दरम्यान सुरू करण्यात आली. तेव्हापासून ते अगदी आतापर्यंत एसटीने दिवसेंदिवस प्रगत करत 7 दिवस आणि 24 तास कार्यरत राहून प्रगतीच्या बाबतीत प्रचंड मोठी भरारी घेतली. गाव तेथे एसटी आणि रस्ता तेथे एसटी असं ब्रीद घेऊन महाराष्ट्रातील मुंबई, पुण्यापासून ते गावं वस्त्यापर्यंत एसटी पोहचली.
त्यानंतर आता काळानुसार एसटी महामंडळाकडून प्रवासीवाढीसह विविध विषयांबाबत अनेक योजना राबवण्यात येत आहेत. मात्र, असे असले तरी यामध्ये आता नगरचा विचार क्वचितच होतो. आता बदलत्या काळात प्रवासाची अनेक साधने आहेत. पण बदलत्या काळात महामंडळही बदलले आहे. साधी लाकडी बस जाऊन त्यानंतर मिडी बस, निमआराम बस, शिवनेरी बस, शिवशाही बस अशा बस महामंडळाच्या ताफ्यात आल्या.
सध्या महामंडळात सुमारे एक लाख कर्मचारी आहेत. महामंडळाच्या सतरा हजार बसमधून रोज सत्तर लाख प्रवासी प्रवास करीत आहेत. आज महामंडळाचा विस्तार राज्याच्या कानाकोपऱ्यात झाला आहे. ज्या गावात रस्ता नाही अगदी अशा गावातही एसटी जाते. महामंडळ तोट्यात असतानाही प्रवाशांची गैरसोय नको म्हणून काही ठिकाणी बससेवा सुरू आहे. खासगी वाहतुकीच्या स्पर्धेत एसटीचे अस्तित्व हरवत चालले आहे. हक्काचा प्रवासी दूर जात असून तोटा वाढत चालला आहे.
विशेष म्हणजे आता खासगी ट्रॅव्हल्सला टक्कर देण्यासाठी एसटी महामंडळाने लांब पल्ल्याच्या एसी स्लीपर बस प्रवाशांच्या सेवेत सुरु करण्याच्यादृष्टीने चाचपणी सुरु केली आहे. हैदराबाद येथे आयोजित देशभरातील बस ओनर्स असोसिएशनच्या प्रदर्शनाला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्यासह काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली.
या प्रदर्शनात विविध बसचीही पाहणी केल्यानंतर पुन्हा एकदा एसटीच्या ताफ्यात एसी स्लीपर बसचा समावेश करण्याची चर्चा सुरु झाली आहे. राज्यात प्रवासी टप्पा वाहतुकीची परवानगी फक्त एसटी महामंडळाला आहे. तरीदेखील राज्यात खासगी ट्रॅव्हल्सची वाहतुक जोमात सुरु आहे. दि. 22 जानेवारी 2018 रोजी परिवहन महामंडळाने एस सी स्लीपर शिवशाही बसची सेवा सुरु केली होती.
मुंबई मध्यवर्ती बसस्थानकातून ही सेवा सुरु करण्यात आली होती. परंतु याबसचे तिकिट दर जास्त असल्याने प्रवाशांनी या सेवेकडे पाठ फिरविली. त्यानंतर महामंडळाने दि. 9 फेब्रुवारी 2019 रोजी तिकिट दरात कपात केली. परंतु प्रवाशांनी मात्र या बसला काही प्रतिसाद दिला नाही. परिणामी महामंडळाने ही बससेवा बंद केली. त्यानंतर महामंडळाने नोव्हेंबर 2019 मध्ये एकाच बसमध्ये स्लीपर व आसन सुविधा असलेली साधी बस ताफ्यात दाखल केली.
एसटी महामंडळाकडून प्रवाशांच्या गरजेनुसार आतापर्यंत विविध बससेवा सुरू केल्या आहेत. एसटीकडे सध्या साध्या, जलद, रातराणी, हिरकणी, वातानुकूलित शिवशाही, शिवनेरी, अश्वमेध अशा विविध बसद्वारे सेवा देण्यात येत आहे. रात्रीच्या वेळेस लांब पल्ल्याचा प्रवास करण्यासाठी प्रवाशांकडून स्लिपर बसेसला प्राधान्य देतात. तसेच मध्यम पल्ल्याच्या प्रवासासाठी प्रवाशांना पुश बॅक आसन व्यवस्था उपयुक्त ठरते.
या पार्श्वभूमीवर महामंडळात नवीन बांधणीची सिटर आणि स्लिपर अशा दोन्ही सुविधा असलेली शयन- आसन रातराणी बस दाखल झाली आहे. या बसची वैशिष्ट्ये – मोबाईल चार्जिंगची सुविधा, मोबाईल ठेवण्यासाठी पाऊच. – प्रत्येक बर्थमध्ये वाचनासाठी दिवा आणि झोपेसाठी निळ्या रंगाचा दिवा. – प्रत्येक शयन कक्षासाठी एक पंखा. – सुरक्षिततेसाठी वाहनामध्ये आग प्रतिबंधक उपकरणे. – प्रत्येक आसनाजवळ बेल पुश अशी सुविधा आहे.
सध्या महामंडळाच्या ताफ्यात अशा प्रकराच्या 216 स्वमालकीच्या बस आहेत. त्यांना प्रवाशांनी अल्प का असेना प्रतिसाद दिला आहे. तसेच हैदराबाद येथे बस प्रदर्शन सुरु आहे. त्याला एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चत्रे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली आहे. या प्रदर्शनात बस उत्पादन करणाऱ्या विविध कंपन्यांच्या आरामदायी स्लीपर एसी द बसही होत्या. महामंडळाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी स्लीपर असलेली साडेतेरा मीटर लांबीच्या बसची पाहणी केली आहे. त्यामुळे प्रवाशांना लवकरच आता पुन्हा आरामदायी आणि वातानुकूलित एसटी बस मध्ये प्रवास करता येणार आहे.
MSRTC ST Bus Passenger Service big Decision