पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कालानुरूप सर्वांची लालपरी म्हणजेच एसटी बसचे रूप बदलत गेले, यापूर्वी साधी बस पुढे एक्सप्रेस झाली, त्यानंतर एशियाड बस आल्या होत्या. पुढे सुपर एक्सप्रेस त्यानंतर शिवशाही बस आल्या. आता शिवनेरी बस या सर्वात अत्याधुनिक मानल्या जातात. मुंबई-पुणे दरम्यान धावणाऱ्या एसटी महामंडळाच्या शिवनेरी बसेस आता महाराष्ट्रातील इतर मार्गावरही चालवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या शिवनेरी बसचे प्रवास भाडे हे शिवशाही बस इतके असणार आहे. त्यामुळे प्रवाशांना आणखी आरामदायी प्रवास करता येणार आहे.
सध्या येथे धावतेय
सध्या जन-शिवनेरी बस ही प्रायोगिक तत्वावर नाशिक-पुणे (शिवाजीनगर) या मार्गादरम्यान चालवण्यात येत आहे. त्याला प्रवाशांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. येत्या काळात मुंबई-पुणे मार्गावर धावत असलेल्या शिवनेरी बसेस ऐवजी ई-शिवनेरी बसेस धावणार आहेत. त्यामुळे तब्बल १०० शिवनेरी बसेस या महाराष्ट्रातील इतर मार्गावर जन-शिवनेरी या नावाने चालवण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे शिवनेरी बसचे तिकीट दर हा १६ रुपये ८०पैसे प्रति टप्पा ( २.८० रुपये/किमी) इतका आहे. ‘जन शिवनेरी’साठी तो १२.९० रुपये प्रति टप्पा इतका (म्हणजे रू २/किमी) ठेवण्यात आलेला आहे.
उदंड प्रतिसाद
मुंबई वगळता महाराष्ट्र इतर शहरादरम्यान धावणाऱ्या जन-शिवनेरी या बसेस सध्याच्या शिवशाही बसच्या जवळपास तिकीट दरात धावणार आहेत. अत्यंत सुरक्षित, अत्याधुनिक सेवा-सुविधांनी युक्त असलेली वातानुकूलित शिवनेरी बससेवा मुंबईच्या बाहेर “जन-शिवनेरी” या नावाने चालविण्यात येत आहे. प्रायोगिक तत्वावर नाशिक-पुणे मार्गावर १० जुलैपासून विनावाहक सुरू करण्यात आलेली या “जन-शिवनेरी” बससेवेला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे.
दिवसभरात एवढ्या फेऱ्या
विशेष म्हणजे वोल्वो आणि स्कॅनिया या कंपनीच्या अत्याधुनिक शिवनेरी बसेस अत्यंत माफक दरामध्ये नाशिक-पुणे (शिवाजीनगर) या मार्गावर “जन-शिवनेरी” या नावाने धावत असून दिवसभरात त्यांच्या १८ फेऱ्या होतात. या बसचे नाशिक-पुणे प्रवासाचे भाडे ५०० रुपये असून महिलांना ५० टक्के सवलतीमुळे केवळ २५५ रुपयात या अत्याधुनिक, सुरक्षित व वातानुकूलित बससेवेचा लाभ घेणे शक्य झाले आहे.
मिळाले एवढे उत्पन्न
सर्वसामान्यांसाठी माफक दरातील या बससेवेचा १०९० प्रवाशांनी प्रवास केला आहे. प्रति किलोमीटर ८० रुपयाप्रमाने ६ लाख ७ हजार उत्पन्न मिळवले आहे. तर ११ जुलै रोजी १८ फेऱ्या ९५७ प्रवाशांचा प्रवास आणि ६ लाख ४ हजाराचे उत्पन्न मिळवल्याचे एसटी प्रशासनाने सांगितले आहे. आणखी विशेष म्हणजे आषाढी यात्रा कालावधीत एसटी महामंडळाला तब्बल २७ कोटी ८८ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. आषाढी यात्रेत तब्बल ८ लाख ८१ लाख वारकऱ्यांनी लालपरीतून प्रवास केला असून सोलापूर विभागाला ४८ लाख ८० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.