नाशिक/छत्रपती संभाजीनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना-भाजप युती सरकारने गेल्या महिन्यात राज्यातील सर्वच महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बस मध्ये प्रवासात ५० टक्के सवलत म्हणजे हाफ तिकीट देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची लगोलग अंमलबजावणी देखील सुरू झाली, परंतु काही ठिकाणी कंडक्टरकडून महिलांना हाफ तिकीट ऐवजी फुल तिकीट देण्याचे प्रकार घडत आहेत. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात असाच प्रकार घडला. त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यातही गेल्या आठवड्यात असा प्रकार घडल्याचे आढळून आले.
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात हा गैरप्रकार घडला असून ‘तुम्ही महिला आहात तुम्ही मला हाफ तिकीट का मागितले नाही?’ असा सवाल कंडक्टरने या तरुणीला केल्याचे समजते. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सिल्लोड ते छत्रपती संभाजीनगर एसटी महामंडळाच्या बसने ही तरुणी प्रवास करत होती. मात्र सध्या पुण्यात नोकरी करणाऱ्या मयुरी देशमुख नावाच्या तरुणीने हा सगळा प्रकार सोशल मीडियावर शेअर केला आहे. ‘ मी महिला आहे मला हाफ तिकीट द्या, हे सांगूनच हाफ तिकीट मिळणार आहे का? असा सवाल या तरुणीने राज्य सरकारला विचारला आहे.’
नाशिक जिल्ह्यात अकोला-नाशिक या एसटी बस मध्येही असाच प्रकार घडला. मालेगावहून सौंदाणे पर्यंत प्रवास करणाऱ्या एका महिलेला देखील असाच अनुभव आला. या बस मध्ये कंडक्टरने सदर महिलेला फुल तिकीट दिले. तेव्हा तुम्ही मला हाफ तिकीट द्या असे सांगायला हवे होते, असा युक्तिवाद कण्डक्टरने केला, त्यावेळी सदर महिलेने बाकी पैसे परत मागितले असता बरीच वादावादी झाली, अखेर कंडक्टरने त्या महिलेला बस मधून उतरताना उर्वरित रक्कम परत केल्याची घटना घडली आहे, असे प्रत्यक्षदर्शी प्रवाशाने सांगितले.
MSRTC ST Bus Half and Full Ticket Passenger Conductor