मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रलंबित असलेल्या आर्थिक मुद्द्यावरून एसटीचे कर्मचारी संपावर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुख्य म्हणजे येत्या काळात गणेशोत्सव, ज्येष्ठागौरी तसेच सण-उत्सवाचे असताना कर्मचारी संपावर गेल्यास मोठी अडचण निर्माण होणार आहे. राज्य सरकारने शुक्रवारी महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा केली आहे. मात्र, कर्मचारी संघटनांचे त्यातून समाधान झालेले नाही. आता ११ सप्टेंबरपासून बेमुदत उपोषण करण्याची घोषणा कर्मचारी संघटनांनी केली आहे.
एसटी कर्मचारी त्यांच्या मागण्यांसाठी पुन्हा आक्रमक झाले असून ऐन गणपतीच्या तोंडावर त्यांनी बेमुदत संपाची हाक दिली आहे. पगारवाढ, पदोन्नती अशा विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांच्या मान्यताप्राप्त संघटनेने प्रलंबित आर्थिक मुद्द्यांच्या सोडवणुकीसाठी ११ सप्टेंबरपासून बेमुदत उपोषणाची हाक दिलीय. हे कर्मचारी मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत उपोषण करणार आहेत. जर सरकारने ऐकले नाही तर १३ सप्टेंबरपासून प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक आगारात कर्मचारी काम बंद करून उपोषणाला बसणार आहेत.
छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीतहा निर्णय घेण्यात आला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मान्यताप्राप्त संघटनेने प्रलंबित मागण्यांसाठी संपाची हाक दिली आहे. या बैठकीत करारातील तरतुदीनुसार सरकारने ४२ टक्के महागाई भत्ता त्वरीत लागू करावा, घरभाडे भत्ता, वेतनवाढीचा दर यांचा फरक त्वरीत अदा करावा, मूळ वेतनात जाहीर झालेल्या पाच हजार, चार हजार, अडीच हजारामुळे सेवाज्येष्ठ कर्मचाऱ्यांच्या वेतनात निर्माण झालेल्या विसंगती दूर कराव्यात अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे. दरम्यान गणपतीचा सण १९ सप्टेंबरला आहे. ११ सप्टेंबरला ही संपाची हाक दिली आहे.
या आहेत मागण्या
दहा वर्षांसाठी सातवा वेतन आयोग लागू करावा. एसटीची धाववेळ (रनिंग टाईम) निश्चित करावी.तसेच वाहकांचे (कंडक्टर) बदली धोरण रद्द करावे, खाजगी गाड्यांऐवजी स्वमालकीच्या नवीन बसेसचा पुरवठा त्वरीत करण्यात यावा. लिपिक- टंकलेखक पदाच्या बढतीसाठी २४० हजर दिवसांची अट रद्द करावी. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पत्नीसह व विद्यमान कर्मचाऱ्यांना महामंडळाच्या सर्व प्रकारच्या गाड्यांचा वर्षभर मोफत फॅमिली पास देण्यात यावा.अनेक विभागात १०-१२ वर्षापासून कर्मचारी टीटीएस आहेत त्यांना एकवेळची बाब म्हणून टीएस करण्यात यावे, जुल्मी शिस्त व आवेदन कार्यपद्धती त्वरीत रद्द करावी, अशा मागण्या संघटनेने केल्या आहेत.
MSRTC ST Bus Employee Strike Threat Demands
Saptember Festivals Government Corporation