मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गणेशोत्सवाच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३४ टक्क्यांवरुन ३८ टक्के करण्याच्या प्रस्तावावर आज मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. सध्या राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेतनासाठी शासनाकडून अर्थसहाय देण्यात येते. त्यामुळे महागाई भत्त्यामध्ये ४ टक्क्यांची वाढ झाल्याने सरकारवर ९ कोटी रुपयांचा बोजा पडेल. त्याचप्रमाणे असुधारित वेतन संरचनेतील राज्य परिवहन कर्मचाऱ्यांना २०३ टक्क्यांवरून वाढवून २१२ टक्के महागाई भत्ता देण्यात येईल.
संपाचा इशारा दिल्याने निर्णय
एसटी कर्मचारी त्यांच्या मागण्यांसाठी पुन्हा आक्रमक झाले असून ऐन गणपतीच्या तोंडावर त्यांनी बेमुदत संपाची हाक दिली आहे. पगारवाढ, पदोन्नती अशा विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांच्या मान्यताप्राप्त संघटनेने प्रलंबित आर्थिक मुद्द्यांच्या सोडवणुकीसाठी ११ सप्टेंबरला ही संपाची हाक दिलीय. हे कर्मचारी मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत उपोषण करणार आहेत. जर सरकारने ऐकले नाही तर १३ सप्टेंबरपासून प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक आगारात कर्मचारी काम बंद करून उपोषणाला बसणार आहेत.
वेतनात विसंगी
छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीतहा निर्णय घेण्यात आला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मान्यताप्राप्त संघटनेने प्रलंबित मागण्यांसाठी संपाची हाक दिली आहे. या बैठकीत करारातील तरतुदीनुसार सरकारने ४२ टक्के महागाई भत्ता त्वरीत लागू करावा, घरभाडे भत्ता, वेतनवाढीचा दर यांचा फरक त्वरीत अदा करावा, मूळ वेतनात जाहीर झालेल्या पाच हजार, चार हजार, अडीच हजारामुळे सेवाज्येष्ठ कर्मचाऱ्यांच्या वेतनात निर्माण झालेल्या विसंगती दूर कराव्यात अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे. दरम्यान गणपतीचा सण १९ सप्टेंबरला आहे. ११ सप्टेंबरला ही संपाची हाक दिली आहे.
या आहेत मागण्या
दहा वर्षांसाठी सातवा वेतन आयोग लागू करावा. एसटीची धाववेळ (रनिंग टाईम) निश्चित करावी.तसेच वाहकांचे (कंडक्टर) बदली धोरण रद्द करावे, खाजगी गाड्यांऐवजी स्वमालकीच्या नवीन बसेसचा पुरवठा त्वरीत करण्यात यावा. लिपिक- टंकलेखक पदाच्या बढतीसाठी २४० हजर दिवसांची अट रद्द करावी. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पत्नीसह व विद्यमान कर्मचाऱ्यांना महामंडळाच्या सर्व प्रकारच्या गाड्यांचा वर्षभर मोफत फॅमिली पास देण्यात यावा.अनेक विभागात १०-१२ वर्षापासून कर्मचारी टीटीएस आहेत त्यांना एकवेळची बाब म्हणून टीएस करण्यात यावे, जुल्मी शिस्त व आवेदन कार्यपद्धती त्वरीत रद्द करावी, अशा मागण्या संघटनेने केल्या आहेत.
Good news for ST employees; Increase in inflation allowance by such percentage
MSRTC ST Bus Employee State Government Hike Dearness Allowance