मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मागील वर्षी दिवाळीपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला होता, सदर संप हा सुमारे सहा महिने चालला. त्यावेळी एसटी कर्मचाऱ्यांच्या या संपात तसेच बेमुदत उपोषणांमध्ये आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी प्रत्यक्षपणे सहभागी होऊन त्याला पाठिंबा दिला होता. इतकेच नव्हे तर तत्कालीन महाविकास आघाडी सरकार विरुद्ध एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नी रान उठवले होते. परंतु त्यानंतर राज्यात सत्तांतर झाल्यावर एसटी कर्मचाऱ्यांचा प्रलंबित प्रश्न सुटेल, अशी अपेक्षा होती. मात्र अद्यापही एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न कायम असून आता पुन्हा एकदा ते प्रश्न ऐरणीवर आले आहेत. कारण आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी सरकारला एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडवावेत, अन्यथा उपोषण करू असा इशारा दिला आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही नेते विद्यमान सरकारचे सहकारी तथा घटक मानले जातात, त्यांनी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे सरकारला पाठिंबा दर्शविला आहे. मात्र आता त्यांनीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या संदर्भातील शहरातून जणू काही घरचाच आहेर दिला आहे, असे म्हटले जात आहे.
मागील वर्षी एसटी महामंडळाचे राज्य शासनत विलिनीकरण व्हावे, या मागणीसाठी संप सुरू होता. त्यानंतर तेव्हा परिवहन मंत्र्यांनी वेतनवाढीसह अन्य काही मागण्या मान्य केल्यानंतर सदाभाऊ खोत व आमदार पडळकर यांनी आंदोलनातून माघार घेतली. मात्र त्यानंतरही पुढे कर्मचाऱ्यांनी संप सुरूच ठेवला होता. एसटी कर्मचाऱ्यांच्या मान्य मागण्यांची अंमलबजावणी न झाल्याने गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्या सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाने मुख्यमंत्र्यांना हिवाळी अधिवेशनात आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. सध्या सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाचे अध्यक्ष गोपीचंद पडळकर, तर कार्याध्यक्ष सदाभाऊ खोत आहेत.
विशेष म्हणजे, सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाने मुख्यमंत्र्यांना मागण्या मान्य करण्यासाठी आठवण करून दिली आहे. वास्तविक पाहता एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय आमदारांची समिती स्थापन करण्यात आली होती. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांच्या सुमारे १६ मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून कोणतीच कार्यवाही न झाल्याने सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाने आक्रमक भूमिका घेतली आहे.
सदर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी मागील महिन्यात चर्चा करण्यात आली होती. त्यानंतर बैठकीचे आश्वासन देऊनही कोणताच निर्णय झाला नसून सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे सध्याची परिस्थिती पाहून दि. १९ नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात आमरण उपोषणाचा निर्णय घेतल्याचे सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
महत्वाचे म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविले नाही, तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी काही दिवसांपूर्वी दिला होता. तसेच अतिवृष्टीच्या काळात कृषीमंत्री, पणन मंत्री आणि सहकार मंत्री यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना धीर देवून मदत करण्याची गरज होती, त्यामुळे या मंत्र्यांनी आता तरी शेतकऱ्यांच्या बांधावर फिरावे असा सल्ला देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारला घरचा आहेर दिला होता.
MSRTC ST Bus Employee Gopichand Padalkar Sadabhau Khot Threat
Politics Government