मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या अडीच महिन्यांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे विस्कळीत झालेली परिवहन सेवा सुरळीत करण्यासाठी एसटी महामंडळाने आता आक्रमकपणे पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. वातंवार विनंती आणि नोटिसा देऊनही कर्मचारी दाद देत नसल्याने आता खासगी कंत्राटी चालकांची नियुक्ती करण्याचे महामंडळाने निश्चित केले आहे. राज्यभरात एकूण ३ हजार कंत्राटी चालकांच्या नियुक्तीची प्रक्रिया महामंडळाने सुरू केली आहे.
एसटीची राज्यभरात सेवा विस्कळीत झाल्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. खासकरुन ग्रामीण आणि दुर्गम भागात वाहतूक सेवेचे तीनतेरा वाजले आहेत. तसेच, एसटी महामंडळाचा तोटाही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळेच आता एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा म्हणून महामंडळाने आता खासगी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीला प्रारंभ केला आहे. पहिल्या टप्प्यात ४०० खासगी कंत्राटी चालकांना नियुक्त केले जाणार आहे. राज्यातील आठ विभागात ही नियुक्ती केली जाणार आहे. त्यात जळगाव, धुळे, नाशिक, औरंगाबाद, पुणे, सोलापूर, भंडारा आणि नागपूर या विभागांचा समावेश आहे. हे खासगी कंत्राटी चालक १० जानेवारीपासून सेवेत येण्याची चिन्हे आहेत. यासंदर्भात कंत्राटदाराला तशा सूचना देण्यात आल्या आहेत. या नियुक्तीत अवजड वाहने चालविण्याचा परवाना आणि अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. आम्ही चार कंत्राटदारांना खासगी कंत्राटी चालक नेमण्यासाठी काम दिल्याची माहिती महामंडळाचे व्यवस्थापकी संचालक शेखर चन्ने यांनी दिली आहे.
सेवानिवृत्तांचे अर्ज
खासगी कंत्राटी चालकांच्या या भरतीमध्ये सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांनीही प्रतिसाद दिला आहे. ३०० पेक्षा अधिक सेवानिवृत्तांचे अर्ज आल्याचे महामंडळाने सांगितले आहे. किती वर्षे वयाच्या सेवानिवृत्तांना संधी द्यायची याचा निकष महामंडळ निश्चित करणार आहे.