मुंबई – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत अर्थसंकल्प मांडताना अनेक योजनांची घोषणा केली. तसेच अनेक विभागांसाठी कोट्यवधींच्या गुंतवणुकीचीही तरतूद करण्यात आली. यात सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्रासाठी १५ हजार ७०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
लोकसभेत बजेट सादर करताना त्या म्हणाल्या की, आम्ही यंदाच्या बजेटमध्ये एमएसएमई क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक नवी पावले उचलली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी दुप्पट म्हणजे १५ हजार ७०० कोटी रुपयांची तरतूद आम्ही केली आहे. आर्थिक समायोजनाबाबत बोलताना त्या म्हणाल्या, अनुसुचित जाती आणि अनुसुचित जमाती तसेच महिलांसाठी स्टँड अप इंडिया योजनेत कर्ज प्रक्रिया अधिक सोयीची करण्यासाठी केवळ २५ टक्के ते १५ टक्के मार्जिन मनीची अनिवार्यता कमी करण्याचा प्रस्तावही त्यांनी मांडला. केंद्रीय अर्थसंकल्पात आरोग्य आणि कल्याण, भौतिक तसेच आर्थिक भांडवल, मूलभूत रचना, आत्मनिर्भर भारत यासाठी सर्वसमावेशक विकास, संशोधन आणि विकास, किमान सरकार व कमाल प्रशासन सुदृढ करणे आदी बाबी समाविष्ट आहेत.