मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महागाईने सर्वसामान्य नागरिक त्रस्त असतानाच आता महागाईचा आणखी एक धक्का नागरिकांना पचवावा लागणार आहे. वीज नियामक आयोगाने वीज बिलातून इंधन समायोजन आकार वसुलीसाठी वीज कंपन्यांना मंजुरी दिली आहे. याचा परिणाम थेट सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. वीजेच्या दरात यामुळे वाढ होणार असून परिणामी वीज बिल महागणार आहे.
कोळसा आणि इंधनाचे दर वाढल्याने इंधन समायोजन आकारामध्ये वाढ करण्यात येणार असल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. जून महिन्यापासून ऑक्टोबर महिन्यापर्यंत जो इंधन समायोजन आकार आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मार्च २०२२ ते मे २०२२ पर्यंत जो इंधन समायोजन आकार होता त्यापेक्षा सहा पटीने सध्या FAC वाढवला आहे. या सगळ्याचा फटका राज्यातला वीज ग्राहकांना बसणार आहे. कोळसा आणि इंधनाचे दर वाढल्याने इंधन समायोजन आकारामध्ये वाढ करण्यात आली आहे. ० ते १०० युनिटसाठी पूर्वी १० पैसे मोजावे लागत ते आता ६५ पैशांपर्यंत मोजावे लागणार आहे. तसेच १०१ ते ३०० युनिटसाठी २० पैसे मोजावे लागत ते आता १ रुपये ४५ पैशांपर्यंत मोजावे लागणार आहे.
जून महिन्यापासूनच लागू
ही दरवाढ जून महिन्यापासून लागू करण्यात आली आहे. ग्राहकांना नव्या इंधन समायोजन आकारातील वाढीमुळे प्रति युनिट सरासरी एक रुपया मोजावा लागणार आहे. मागील चार महिन्यात वीज खरेदीवर मोठ्या प्रमाणात खर्च झाला आहे. तो सगळा आता या जादा वीज बिल दरातून भरला जाणार आहे. महावितरण, रिलायन्स, बेस्ट, अदानी या सगळ्या कंपन्यांच्या ग्राहकांवर या महागाईचा परिणाम होणार आहे. साधारणतः ८० ते ३०० रुपये प्रति महिना इतकी वाढ वील बिलात होऊ शकते असे सांगण्यात येत आहे.
कोळसा आणि इतर इंधनाचे दर वाढले असल्याने वीज कंपन्यांनी जो निधी राखून ठेवला होता तोदेखील संपुष्टात आला आहे. काही महिन्यांपूर्वीच वीज नियामक आयोगाने याबाबत सूचना दिल्या होत्या. वीज कंपन्यांचा खर्च वाढला की या कंपन्या वीज अधिक दराने विकतात. शिवाय, ग्राहकांकडून इंधन समायोजन करही वेगळा आकारतात. या सगळ्यामुळे वीजबिल महागणार आहे.
MSEDCL Electricity bill Charges Hike Inflation Common Man