पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विविध मागण्यांसाठी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे पुण्यात आंदोलन सुरू आहे. हे विद्यार्थ्या रस्त्यावर आंदोलन करीत असून सोमवारी रात्री अचानक पथदिवे बंद झाले. त्यामुळे गोंधळून न जाता विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या टॉर्चमध्ये आपले आंदोलन सुरू ठेवले आहे. मंगळवारी देखील विद्यार्थी आंदोलनावर कायम आहेत.
नवा अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करावा, पॅटर्न लागू करण्याची घाई करू नये, अभ्यास करण्यासाठी किमान ५ ते ६ महिन्यांचा वेळ द्यावा, नवा अभ्यासक्रम युपीएससीच्या धरतीवर असल्यामुळे त्याची पुस्तकं उपलब्ध नसल्याने त्यात सुधारणा व्हावी, या मागण्यासाठी पुण्यातील एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारले आहे. नवी परीक्षा पद्धती 2025 पासून लागू करण्याच्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी एमपीएससीचे विद्यार्थी आंदोलनावर ठाम आहेत.
पुण्यातल्या झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकात हे आंदोलन सुरु आहे. सोमवारी काळोख्या अंधारात देखील विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच होतं. गेल्या दोन महिन्यातील एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे हे तिसरे आंदोलन आहे. जानेवारीच्या अखेरीस विद्यार्थ्यांची मागणी मान्य करत सरकारने नव्या परीक्षा पद्धतीची अंमलबजावणी पुढे ढकलली होती. मात्र हा निर्णय घेऊन तीन आठवडे झाले तरी निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर उतरले आहेत.
म्हणून विद्यार्थी आक्रमक
कोरोनामुळे दोन वर्षे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला. अशात परीक्षांच्या तारखा लवकर जाहीर झाल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थी संतापले होते. पण पुढे सरकारने नवा पॅटर्न लागू करण्याची घोषणा केल्याने विद्यार्थी अधिकच आक्रमक झाले. यासाठी सरकारने घाई करू नये, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
जयंत पाटलांची भेट
माजी मंत्री जयंत पाटील यांनी आंदोलस्थळाला भेट देऊन विद्यार्थ्यांचे म्हणणे समजून घेतले. त्यावेळी लाईट्स गेल्यामुळे विद्यार्थी मोबाईलच्या टॉर्चमध्ये आंदोलन करीत होते. जयंत पाटलांचं स्वागत टॉर्चच्या उजेडात करण्यात आले. एमपीएससीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.
निवडणुकीला येणारे नेते
पुण्यातील कसबा आणि चिंचवड या दोन मतदारसंघांची पोटनिवडणूक सध्या होत आहे. त्यानिमित्त प्रचारासाठी विविध पक्षांचे नेते सध्या पुण्यात येत आहेत. याचनिमित्ताने या विद्यार्थी आंदोलकांना भेटण्यासाठीही नेते येत आहेत. त्यातील काही पाठिंबा देत आहेत तर काही जण सरकारशी पाठपुरावा करण्याची ग्वाही देत आहेत.
https://twitter.com/ivaibhavk/status/1627682899213561857?s=20
MPSC Students Agitation in Pune Various Demands