मुंबई – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. कोरोनाच्या संकटामुळे गेल्या दोन वर्षांपासून चिंतेत असलेल्या विद्यार्थ्यांना महाविकास आघाडी सरकारने मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. त्याची माहिती प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. कोरोनाच्या संकटामुळे गेल्या दोन वर्षात आयोगाच्या परीक्षांचेच आयोजन झाले नाही. त्यामुळे परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर मोठा परिणाम झाला. तसेच, ज्या विद्यार्थ्यांना वयोमर्यादेमुळे अखेरची संधी होती, ते तर आणखीनच संकटात सापडले होते. त्यामुळेच अशा विद्यार्थ्यांना पुढील दोन वर्षे परीक्षा देण्याची संधी देण्यात यावी, अशी मागणी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून केली जात होती. यासंदर्भात सरकारकडे विविध निवेदने देण्यात आली होती. त्याची दखल घेत अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठोस निर्णय घेतला आहे. स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना आणखी एक वर्ष परीक्षा देता येणार आहे. तसे मंत्री भरणे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना त्याचा लाभ घेता येणार आहे.
https://twitter.com/bharanemamaNCP/status/1458432084733677572