एमपीएससीने 2019 मध्ये निवड केलेल्या कर सहायक व लिपिक -टंकलेखकांच्या नियुक्त्या पंधरा दिवसांत होणार
मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन २०१९ मध्ये गट ‘क’ साठी घेण्यात आलेल्या कर सहाय्यक आणि लिपिक-टंकलेखक पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना पंधरा दिवसात नियुक्ती देण्यात येईल, अशी माहिती सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत दिली.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट ‘क’ मध्ये सन २०१९ मध्ये कर सहायक,लिपिक टंकलेखक व दुय्यम निरीक्षक या तीन पदांसाठी पदभरती प्रक्रिया वेगवेगळ्या कारणांमुळे प्रलंबित आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणाऱ्या पदभरती विहित वेळेत केल्या जाव्यात तसेच या प्रक्रिया एका ठराविक कालबध्द पद्धतीने करण्यासंदर्भात विधानसभा सदस्य डॉ.विनय कोरे यांनी प्रश्न उपस्थित केला. या चर्चेत सदस्य सर्वश्री चंद्रकांत पाटील, प्रकाश आबिटकर, नाना पटोले, योगेश सागर यांनी भाग घेतला.
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शासन निर्णय काढला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दि.९ सप्टेंबर २०२० रोजी अंतरिम आदेशान्वये एसईबीसी आरक्षणासह स्थगिती दिली होती.
प्राप्त माहितीनुसार कर सहायकांची- १२६ आणि लिपीक टंकलेखकाच्या -१७९ पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना पंधरा दिवसात नियुक्ती देण्यात येण्याबाबत तसेच ३३ दुय्यम निरीक्षक मधील १७ जणांना नेमणूक आदेश दिले असून उर्वरित प्रक्रिया पूर्ण करून सर्वांच्या वेळेत नेमणूका करण्यात येतील. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गेल्या सहा महिन्यात साधारणत: तीनशे परीक्षांच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत, असेही सामान्य प्रशासन राज्यमंत्री श्री.भरणे यांनी सांगितले.
राज्यातील बंद सेतू सुविधा केंद्रे तीन महिन्यांत सुरू होणार
मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात सध्या बंद असलेल्या सेतू सुविधा केंद्रांची व तहसिल कार्यालयांची माहिती घेवून तीन महिन्यांच्या आत हे सेतू सुविधा केंद्र पुन्हा सुरू करण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाला देण्यात येतील, अशी माहिती सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत दिली.
लातूर जिल्ह्यातील तहसिल कार्यालयात सर्वच एकात्मिक नागरी सेतू सुविधा केंद्र ३१ डिसेंबर २०२१ रोजी पासून बंद आहेत. त्यामुळे नागरिकांच्या गैरसोयीबद्दल प्रश्न विधानसभा सदस्य धीरज देशमुख यांनी विधानसभेत विचारला होता. या चर्चेत नमिता मुदंडा यांनी भाग घेतला.
लातूर जिल्ह्यातील सर्व तहसिलदारांना सर्व प्रकारच्या सेवा विहित कालावधीत व विहित शुल्क आकारून देण्याबाबत सूचना देण्यात येतील. राज्यात देखील 12 जिल्ह्यातील तहसिलअंतर्गत सेतू सुविधा केंद्र बंद आहेत अशा तक्रारींची माहिती घेऊन सदर सेतू सुविधा केंद्र तीन महिन्यात पुन्हा सुरू करण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाला देण्यात येतील, अशी माहिती श्री. भरणे यांनी विधानसभेत दिली.