इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राज्यात विविध भागात झालेला पाऊस, पूरस्थिती आणि येत्या २-३ दिवसांत आणखी पावसाचा हवामान खात्याचा इशारा पाहता, येत्या २८ सप्टेंबर रोजी होणारी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी विनंती करणारे एक पत्र राज्य सरकारने एमपीएससीला पाठविले आहे. त्यावर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन आयोगाने दिले आहे. राज्यातील विविध भागातील परीक्षार्थींनी अशाप्रकारची मागणी आमच्याकडे केली होती अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्यानंतर महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ -दिनांक २८ सप्टेंबर २०२५ ऐवजी सुधारित दिनांकास म्हणजेच दिनांक ९ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात येत आहे. यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्याचे म्हटले आहे.
याअगोदर आमदार रोहित पवार यांनी राज्यात सध्या Orange alert असून मराठवाड्यासह बऱ्याच जिल्ह्यात पूरस्थिती आहे. अशा वेळी २८ सप्टेंबर रोजी होणारी PSC राज्य सेवा परिक्षा पुढे ढकलण्याबाबत योग्य निर्णय घेण्याची गरज आहे. जेणेकरून या परीक्षेची तयारी करणारा कोणताही उमेदवार परीक्षेला मुकणार नाही. तसंच सारथी, बार्टीचे पेपर २९ व ३० तारखेला होत आहेत. याबाबतही योग्य निर्णय घ्यावा असे म्हटले होते.
