पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एमपीएससी परीक्षेत राज्यात सहावा क्रमांक पटकावणारी अहमदनगरची दर्शना दत्ता पवार हिच्या खुनामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास करताना तिच्या मित्रानेच खून केल्याचा दावा केला जात आहे. आता मित्रानेच खून केला, की अज्ञान लोकांनी खून केल्यामुळे मित्र पसार झाला, याचा शोध घेणे सुरू आहे.
एमपीएससीचा निकाल लागून फार दिवस झाले नाहीत. राज्यात सहाव्या क्रमांकावर असलेली दर्शना आता रेंज फॉरेस्ट अॉफिसर झाली होती. यातच ९ जूनला पुण्यातील एका संस्थेने तिला सत्कारासाठी आमंत्रित केले. ती पुण्यात आली आणि सिंहगडाजवळ एका मैत्रीणीकडे थांबली. तिथनं सत्कारासाठी गेली. त्यानंतर दोन दिवस ती पुण्यात थांबणार होती. त्यामुळे कुटुंबियांना काळजी नव्हती. पण १२ जूनला सकाळपासूनच तिचा फोन बंद होता. काहीवेळ फोन लागला नाही आणि त्यानंतर तो बंदच आला. त्यामुळे कुटुंबीयांची चिंता वाढली. त्यांनी सिंहगड पोलिसांमध्ये बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.
कारण राहूल दत्तात्रय हांडोरे या मित्रासोबत फिरायला गेल्याचे कळले होते. त्याचवेळी राहूल बेपत्ता असल्याची तक्रारही त्याच्या कुटुंबियांनी पोलिसांमध्ये दिली. त्यानंतर पोलिसांचा शोध सुरू झाला. मधल्या काळात अनेक शक्यता तपासण्यात आल्या. पण काहीही हाती लागले नाही. १७ जूनला राजगडाच्या पायथ्याशी दर्शनाचा मृतदेह अर्धवट सडलेल्या अवस्थेत आढळला. स्थानिकांनी पोलिसांना कळवले. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर दर्शनाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. त्यावेळी तिचा खून झाल्याचे उघडकीस आले.
किल्ल्यावरून एकटाच खाली आला तो!
पोलिसांनी सीसीटीव्हीद्वारे घटनाक्रम माहिती करून घेण्याचा प्रयत्न केला. त्यात दर्शना आणि राहूल सकाळी सव्वासहाच्या सुमारास किल्ल्यावर गेल्याचे आढळले. त्यानंतर काही वेळाने राहूल एकटाच खाली आला, असे दिसत आहे. त्यामुळे प्रथमदर्शनी राहूलनेच खून केला आहे, असा अंदाज पोलिसांनी लावला आहे. राहूल फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
डोक्यावर जखमा
दर्शनाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करताना तिच्या डोक्यासह शरीराच्या इतर भागांवरही जखमा असल्याचे आढळले. त्यामुळे खून झाला हे निश्चित कळले. पण राहूलने तिचा खून केला, की किल्ल्यावर त्यांच्यासोबत काही वाईट प्रकार घडला आणि त्यानंतर घाबरून राहूल फरार झाला, हे अद्याप कळू शकलेले नाही.