मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेले काही महिने जागतिक मंदीच्या चर्चा सुरू आहेत. आयटीमध्ये तर मंदी सुरू आहेच, शिवाय येत्या जूनपर्यंत मंदीची आणखी एक लाट भारतात येण्याचे सूतोवाच अलीकडेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले. नोकऱ्या जाणार हे ऐकल्यावर आधीपासून नोकरीच्या शोधात असलेल्या बेरोजगारांमध्ये भिती निर्माण होणे स्वाभाविक आहे. परंतु, एमपीएससीने बेरोजगारांना दिलासा देणारी बातमी दिली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) राज्यात तब्बल ८ हजार १६९ पदांची भरती जाहीर केली आहे. आयोगाने आपल्या संकेतस्थळावर याबद्दल सविस्तर माहिती दिली असून नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी हा एक मोठा दिलासा ठरणार आहे. सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, दुय्यम निबंधक (श्रेणी-१)/मुद्रांक निरीक्षक, दुय्यम निरीक्षक-राज्य उत्पादन शुल्क, तांत्रिक सहायक, कर सहायक, लिपिक-टंकलेखक या पदांसाठी ही भरती करण्यात येत आहे.
महाराष्ट्रात ३७ केंद्र
महाराष्ट्र अराजपात्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व पूर्व परीक्षा २०२३ मधून ही पदे भरली जाणार आहेत. गट ब साठी २ सप्टेंबर २०२३ आणि क गटासाठी ९ सप्टेंबरला परीक्षा होणार आहे. तसेच महाराष्ट्र राज्यपात्रित गट ब आणि गट क सेवा संयुक्त परीक्षा ३० एप्रिल २०२३ ला होणार आहे. यासाठी महाराष्ट्रातील ३७ जिल्ह्यांमध्ये केंद्र असणार आहे.
सव्वा लाखापर्यंत वेतन
सहायक कक्ष अधिकाऱ्याची ७० पदे व महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील ८ पदे भरली जाणार आहेत. गृह विभागातील पोलीस उपनिरीक्षकांची ३७४ पदे तर वित्त विभागातील राज्य कर निरीक्षकांची १५९ पदे भरली जाणार आहेत. सर्व कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता व इतर भत्ते नियमाप्रमाणे मिळणार आहेत. विशेष म्हणजे या सर्वांचे वेतन ३८ हजार ६०० ते १ लाख २२ हजार रुपयांपर्यंत असणार आहे.
अशी आहेत इतर पदे
वित्त विभागातील तांत्रिक सहायकाची एक जागा असेल आणि त्याचा पगार २९ हजार २०० रुपये ते ९२ हजार ३०० रुपये एवढा असेल. गृह विभागात दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क यासाठी ६ पदे भरली जाणार असून त्यासाठी ३२ हजार ते दिड लाख एवढे वेतन असणार आहे.
महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधून भरावयाच्या एकूण 8,169 पदांच्या भरतीकरिता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात(क्रमांक 01/2023) प्रसिद्ध करण्यात आली आहे.https://t.co/MCMN6Peqpt
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) January 20, 2023
महाराष्ट्र शासनाच्या विविध कार्यालयांमधील सुमारे ८ हजार पेक्षा अधिक पदांच्या भरतीसाठी आज, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहिरात प्रसिद्ध केली आहे. लोकसेवा आयोगाच्या ८५ वर्षांच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणातील पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली असून फक्त एकाच अर्जाद्वारे विविध संवर्गातील या भरती प्रक्रियेत उमेदवारांना सहभागी होता येणार आहे, असे आयोगाचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर यांनी सांगितले.
राज्य शासनाचे सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, वित्त, गृह, महसूल व वन आदी मंत्रालयीन प्रशासकीय विभाग आणि महाराष्ट्रातील विविध कार्यालयांमध्ये ८ हजार १६९ पदांची भरती करण्यात येणार आहे. यासाठी आज आयोगाने जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या पदांच्या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी २५ जानेवारी ते १४ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर करावा, असे आवाहन अध्यक्ष श्री. निंबाळकर यांनी केले आहे.
या पद भरतीसाठी ३० एप्रिल २०२३ रोजी महाराष्ट्रातील सर्व जिल्हा केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार आहे. पद भरतीचा तपशील, अर्हता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची पद्धत, परीक्षा योजना, अभ्यासक्रम आदी तपशील आयोगाच्या www.mpsc.gov.in तसेच www.mpsconline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी या भरती प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहनही अध्यक्ष श्री. निंबाळकर यांनी केले आहे.
‘या’ विभागांमध्ये होणार ८ हजार १६९ पदांची भरती
सामान्य प्रशासन विभाग – सहायक कक्ष अधिकारी – ७० पदे
महाराष्ट्र लोकसेवा आयोग- सहायक कक्ष अधिकारी – ८ पदे
वित्त विभाग – राज्य कर निरीक्षक – १५९ पदे
गृह विभाग- पोलीस उपनिरीक्षक – ३७४ पदे
महसूल व वन विभाग – दुय्यम निबंधक (श्रेणी -१)/मुद्रांक निरीक्षक – ४९ पदे
गृह विभाग- दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क – ६ पदे
वित्त विभाग – तांत्रिक सहायक – १ पद
वित्त विभाग – कर सहायक – ४६८ पदे
मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच राज्य शासनाची महाराष्ट्रातील विविध कार्यालये – लिपिक टंकलेखक – ७०३४ पदे
MPSC 8 Thousand Post Recruitment Declared