नाशिक – ड्रग इन्स्पेक्टर या पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नुकतीच ८७ जागांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. परंतु त्यामध्ये ३ वर्ष अनुभवाची अट टाकलेली आहे. याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे पदाधिकारी आक्रमक झालेले दिसून आले. यासंदर्भात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल दादा गव्हाणे यांच्या नेतृत्वात प्रदेश सरचिटणीस अमोल पाटील व सर्व विभागीय उपाध्यक्षांनी हा मुद्दा महाराष्ट्र स्तरावर उचलून धरला आहे.
सदर परीक्षेच्या जाहिरातीत अनुभवाची अट देण्यात आली आहे. मात्र,या संदर्भात दिल्ली उच्च न्यायालयाने २०१८ साली ड्रग इन्स्पेक्टर या पदासाठी परीक्षा घेतली होती तेव्हा निधी पांडे vs संघ लोकसेवा आयोग केस मध्ये CAT ने ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट १९४५ च्या नियम ४९ नुसार असे सांगितले की अनुभवाची अट नियुक्ती नंतर लागू होते म्हणून दिल्ली, हिमाचल प्रदेश ,तामिळनाडू ,राजस्थान , सिक्कीम इत्यादी राज्यांनी त्यांची ड्रग इन्स्पेक्टर पदाची पात्रता अट शिथिल केली. तसेच याच धर्तीवर केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC ) यांनी सुद्धा पदाची अनुभव अट काढून टाकली. महाराष्ट्र लोकसेवा आयोग, अन्न व औषध प्रशासन मंत्रालय, सामान्य प्रशासन विभाग यांचेकडे निवेदन देण्यात येणार असून अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे व सामान्य प्रशासन विभागाचे मंत्री दत्तात्रय भरणे यांचेपर्यंत हे महत्वाचे मुद्दे प्रदेशाध्यक्ष सुनिल दादा गव्हाणे यांचेतर्फे मांडण्यात येणार आहेत. यासंदर्भात फार्मसी विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत करण्याची भावना यावेळी सुनिल दादांनी मांडली.
महाराष्ट्रातील अन्न व औषध प्रशासन विभागात आधीच औषध निरीक्षक संख्येने खूप कमी आहेत. सर्व फार्मसी पदवीधारक या परीक्षेची आतुरतेने वाट बघत असतात. त्यात अशा अटी समाविष्ट होतात त्यामुळे बहुसंख्य उमेदवारांना परीक्षेपासून वंचित रहावे लागते. फार्मसी विद्यार्थ्यांना टेक्निकल शिक्षण घेऊन पण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या फॉरेस्ट आणि महिला व बालविकास अधिकारी होता येत नाही, तसेच अनुभव नसल्यामुळे नुकतेच पदवी परीक्षा पास झालेले व नोकरीच्या शोधात असलेल्या विद्यार्थ्यांना ड्रग इन्स्पेक्टरच्या परीक्षेस बसता येत नाही. या सर्व गोष्टींचा शासनाने विचार करावा व फार्मसी विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर कराव्या अशी आग्रहाची भूमिका प्रदेश सरचिटणीस अमोल पाटील यांनी घेतली आहे. उत्तर महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्ष सौरभ माळी, पश्चिम महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्ष सौरभ भोईटे, मराठवाडा विभागीय उपाध्यक्ष आकाश हिवराळे व अमरावती विभागीय उपाध्यक्ष विवेक सावदे यांचेकडे यासंदर्भात विद्यार्थ्यांनी अडचणी मांडाव्यात असे आवाहन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या औषधनिर्माणशास्त्र विभागातर्फे करण्यात आले आहे.