मुंबई – एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलल्याचा रोष असल्याने विद्यार्थी थेट रस्त्यावर उतरल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याची गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळेच या परीक्षेची तारीख उद्या शुक्रवारी (१२ मार्च) घोषित केली जाणार आहे. तसे निर्देश मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिव आणि एमपीएससीच्या अध्यक्षांना दिले आहेत. ही परीक्षा आठवड्याभरातच घेतली जाणार आहे. तसे ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
१४ मार्च रोजी होणारा एमपीएससीचा पेपर अचानक रद्द करण्यात आला. त्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन केले. राज्यभरात ही बाब चर्चेची ठरली. भाजपने याप्रकरणी राज्य सरकारवर तोंडसुख घेतले. याची दखल मुख्यमंत्री ठाकरे यांनी घेतली. यासंदर्भात त्यांनी मुख्यसचिवांसह विविध अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच, राज्याचे पोलिस महासंचालक हेमंत नगराळे यांच्याशी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेविषयी चर्चा केली. १४ मार्चचा पेपर याच आठवड्यात घेण्यात यावा आणि त्याची तारीख उद्याच घोषित करावी, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश आल्याचे दिसून येत आहे.