मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -राज्यातील सत्ताधारी पक्षातील नेते व्होट जिहाद असा शब्दप्रयोग करून एका विशिष्ट धर्माचा अपमान करत आहेत. निवडणुकीत कोणी कोणाला मतदान करायचे हा त्या मतदाराचा अधिकार आहे. जर एखाद्या मतदाराने किंवा काही भागातील बहुसंख्य मतदारांनी मतदान केले असेल तर त्याला व्होट जिहाद म्हणण्याचा कोणालाही अधिकार नाही. संविधानाने मतदाराला दिलेल्या हक्क व अधिकाराचे हे उल्लंघन असल्याचे सांगत काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे.
या तक्रारीत म्हटले आहे की, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने घेतलेल्या एका पत्रकार परिषदतच व्होट जिहाद सारखे विधाने केल्यास त्यावर तात्काळ कारवाई केली जाईल असे आपण जाहीर केले होते. भारतीय जनता पक्षाचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी १९ ऑक्टोबर २०२४ रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत, “धारावी पुनर्विकासाचा उपयोग करून तिथल्या रहिवाशांची माथी भडकवून, धारावीकरांचा उपयोग करून मुंबईत व्होटजिहाद केला जात आहे. असे विधान केले आहे.
भारतीय जनता पक्षाचे नेते अशा पद्धतीने विशिष्ट धर्माच्या लोकांना जाणीवपूर्वक टार्गेट करत आहेत. संविधानाने त्यांना दिलेल्या मतदानाच्या हक्कावर गदा आणत आहेत. अशा प्रकारे विधान करून भाजपा धार्मिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे. आशिष शेलार यांच्या विधानाची आपण गंभीर दखल घेऊन त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी.