इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अभिनेत्री व भाजप खासदार कंगना रनौत यांच्या निवासस्थानी ‘राष्ट्र सेविका समिती’ महिला शाखेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी व खासदार सुनेत्रा पवार देखील उपस्थितीत होत्या. त्यांचा फोटो समोर आल्यानंतर त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहे. अजित पवार आमची पुरोगामी विचारधारा आहे असे सांगतात. मात्र त्यांच्या पत्नी दिल्लीत संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित असतात अशी टीका होत आहे.
दरम्यान या टीकेला खा. सुनेत्रा पवार यांनी उत्तर दिले आहे. एका मीटिंगमध्ये माझ्या उपस्थितीबाबत चर्चा सुरू आहे, ज्याबाबत मी स्पष्टीकरण देऊ इच्छिते की त्यामागे कोणताही राजकीय उद्देश्य नव्हता. यात इतर महिला खासदारही सहभागी होत्या. राज्यसभेच्या खासदार म्हणून आणि बारामतीमध्ये दीर्घकाळ सामाजिक कार्य करत असताना, मला विविध महिला संघटनांच्या कामाची प्रत्यक्ष ओळख करून घेण्याची उत्सुकता असते. त्या बैठकीत विविध राज्यांतील महिला सहभागी होत्या. त्यांचे उपक्रम आणि कार्यपद्धती समजून घेण्यासाठीच मी तिथे गेले होते. त्या वेळी मला बोलण्यास सांगितले, तर मी फक्त दोन शब्दात माझी भूमिका मांडली. कृपया माझ्या या उपस्थितीचा राजकीय अर्थ काढू नये. समाजातील महिलांचे कार्य समजून घेणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे हाच माझा उद्देश होता, आहे आणि राहील. तर अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. मला माहीत नाही, माझी बायको सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुठे जाते. त्याची मिनिट टू मिनिट माहिती मला नसते. मी आता विचारतो, का गं कुठे गेली होतीस..
या कार्यक्रमाबाबत कंगना रनौत यांनी सांगितले की, माझ्या निवासस्थानी ‘राष्ट्र सेविका समिती’ महिला शाखेचे आयोजन करण्यात आले होते. आपण एकत्रितपणे सनातन मूल्ये, हिंदू संस्कृती आणि राष्ट्रीय जाणीव अधिक प्रमुख बनवू. आपण सर्वांनी मानव सेवा, राष्ट्रनिर्माण आणि सनातन संस्कृतीचे जतन करण्यासाठी सतत काम करण्याचा संकल्प केला आहे. महिलांची जागरूकता आणि सहभागच राष्ट्राला बलवान बनवतो.