अहमदनगर – सर्वसामान्य जनता एकेका रेमडेसिविर इंजेक्शनसाठी वणवण भटकत असताना खासदार डॉ. सुजय विखे यांनी थेट दिल्लीतून गुपचुपपणे नगरमध्ये रेमडेसिविरचा मोठा साठा आणल्याची बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे, विखे यांनीच ही बाब फेसबुक पोस्टद्वारे उघड केली आहे. एकीकडे हे इंजेक्शन मिळत नाही आणि दुसरीकडे असा मोठा साठा भाजप पदाधिकारी आणि खासदारांना कसा मिळतो, असा प्रश्न सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे.
मी आणलेली इंजेक्शन ही केवळ माझ्यासाठी नाही तर सर्वांसाठी आहेत. सर्व पक्षातील लोकांसाठी आहेत. यासंदर्भात कुणीही राजकारण करु नये. दोन दिवसांपूर्वीचा हा व्हिडिओ मी मुद्दाम आजच अपलोड करीत आहे, असे डॉ. विखे यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. कोरोनाचे संकट मोठे आहे. मला जे शक्य आणि मला जेवढे करता येईल ते मी करतो आहे. शेवटी मी माझ्या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधीत्व करतो. त्यामुळे मला जे जमेल तेवढे मी करतोय आणि यापुढेही करीन, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
माझ्या मैत्रीमुळे आणि संबंधांमुळेच मी इंजेक्शनच्या कंपनीत गेलो. तेथून इंजेक्शन्स घेतले आणि खासगी विमानाने मी ही इंजेक्शन आणली आहेत. माझ्यावर कारवाई होईल की नाही, हे मला माहित नाही, पण मी मदत करत राहणार, असे डॉ. विखे यांनी म्हटले आहे. तरुणांचा इंजेक्शन आणि औषधा अभावी जीव जात आहे. मला कुठलेही श्रेय नको. डॉक्टर नात्याने मला जबाबदारी वाटते. मी चांगले काम करीत असतानाही माझ्या मनात भीती आहे. म्हणून मी नंतर व्हिडिओ टाकत आहे. जिल्हाधिकारी, सिव्हिल सर्जन आणि प्रशासनाच्या मदतीमुळे हे मी करु शकलो, असेही डॉ. विखे म्हणाले.
बघा हा व्हिडिओ
https://www.facebook.com/watch/?v=472746474000667