इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मध्य प्रदेशच्या सिहोर जिल्ह्यातील रुद्राक्ष महोत्सव सध्या देशभरात चर्चेचा विषय आहे. चितवलिया हेमा येथे मुरली मनोहर आणि कुबेरेश्वर महादेव मंदिराचे निर्माण होत आहे. उत्सवादरम्यान आतापर्यंत तीन महिला, एक बालक आणि एका हेड कॉन्स्टेबलसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. झाशी येथील एका महिलेचा सोमवारी सकाळी मृत्यू झाला. तर, सोमवारी संध्याकाळी इंदूरच्या हेड कॉन्स्टेबलचा ड्युटीवर असताना मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, झाशी येथील रहिवासी पूनम प्रकाश ठाकूर (वय ४०) हिचा सोमवारी सकाळी कुबेरेश्वर धाममध्ये मृत्यू झाला. महिलेचे शासकीय रुग्णालयात पोस्टमॉर्टम करण्यात आले. प्राथमिक अहवालात महिलेच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका व पोटात पाणी येणे व आजारपणाचे कारण देण्यात आले आहे. मृत्यूनंतर महिलेला कुबेरेश्वर धाम येथून रुग्णवाहिकेद्वारे जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले, तेथे सायंकाळी शवविच्छेदनानंतर मृतदेह झाशी येथून कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.
पोलिस अधिक्षक मयंक अवस्थी म्हणाले की, पंडित प्रदीप मिश्रा यांच्या कथेच्या ठिकाणी हेड कॉन्स्टेबल श्याम मीना कर्तव्य बजावत होते. १७ फेब्रुवारी रोजीच त्यांनी वयाची ४५ वर्षे पूर्ण केली. सोमवारी सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत त्यांनी ड्युटी केली. त्यानंतर ते आष्टा गाव भौराजवळील मित्राच्या घरी गेले होते, तिथेच त्यांचा मृत्यू झाला.
मारहाणीचा महिलेकडून आरोप
पंडित मिश्रा यांच्या नातेवाईकांनी मारहाण केल्याचा गंभीर आरोप इंद्रा मालवीय (३५, घाटपिपलिया, मनसा जि. नीमच) या महिलेने केला आहे. पोलिसांकडे तक्रार करताना महिलेने सांगितले की, ती सोमवारी कुबेरेश्वर धामला पोहोचली होती. याठिकाणी समितीचे सदस्य व कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांचा भाचा समीर शुक्ला व समितीच्या इतर सदस्यांनी त्यांना एका खोलीत नेऊन कथेच्या नावाखाली मारहाण करून त्यांच्याकडे कथेच्या नावावर पैशांची मागणी केली. कुटुंबीयांकडून त्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यासाठी दबाव टाकला.
या प्रकरणी मंडी पोलिस स्टेशनचे प्रभारी हरिनारायण परमार सांगतात की, एका महिलेने तक्रार दाखल केली आहे. सध्या आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत, तपासानंतरच काही सांगता येईल, सध्या या महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. दोन्ही पक्षांचे जबाब नोंदवून पुढील कारवाई करण्यात येईल. दरम्यान, हा आरोप निराधार असल्याचे समितीचे म्हणणे आहे. समितीला बदनाम करण्याचे षडयंत्र विरोधकांकडून रचले जात आहे.
MP Sehore Kubereshwar Dham 5 Devotees Death