मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्रातील दंगली सरकार पुरस्कृत आहेत. छत्रपती संभाजी नगरमध्ये उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे. त्यामुळेच आमचा मार्ग अडवण्यासाठी ही दंगल घडवण्यात आली आहे. आमची भूमिका मवाळ आहे, असे सरकार म्हणत असेल तर मग काय आम्ही दंगलीत सहभागी व्हावे का. सरकार शंभर टक्के दंगलीत सहभागी आहे. महाराष्ट्रात एवढा मोठा गुढीपाडवा मेळावा झाला, पण कुठेही काहीच झाले नाही, मग रामनवमीलाच कसे झाले? यामागे कोणी ना कोणी षडयंत्र करत आहे. यामागे सरकारचे अपयशही आहे असा हल्लाबोल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
राऊत पुढे म्हणाले की, बंगालमध्येही भाजप दंगली घडवत आहे. 2024 पर्यंत त्यांना संपूर्ण देशातील वातावरण बिघडवायचे आहे. यामागे जे लोक देशात सत्तेत आहेत किंवा महाराष्ट्रात सत्तेत आहेत, तेच हे सर्व करून घेत आहेत, असा आरोपी त्यांनी केला.
राऊत यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाप्रमाणे जीवे मारण्याची धमकी राऊत यांना पाठवलेल्या मेसेजमध्ये देण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पुण्यातील एका तरुणालाही ताब्यात घेतले आहे. आता या प्रकरणावर संजय राऊत म्हणाले की, मी धमकीला जास्त महत्त्व देत नाही. मुख्यमंत्र्यांचा मुलगा श्रीकांत शिंदे याने महिनाभरापूर्वीच माझ्यावर हल्ल्याचा कट रचला होता. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी सर्व पुरावे दिले होते, पण काहीही झाले नाही, असे राऊत यांनी स्पष्ट केले.
राऊत म्हणाले की, जेव्हा विरोधी पक्षाच्या नेत्यांना धमक्या दिल्या जातात तेव्हा त्याला राजकीय स्टंट म्हणतात. कालही मला धमकीचा मेसेज आला आहे. याबाबत मी गृहमंत्र्यांना माहिती दिली आहे. आता त्याची चौकशी करायची की नाही, त्याची मला परवा नाही. पोलिसांना ते गंभीर वाटत असेल तर त्यांनी तपास करावा. मला कोणत्याही सुरक्षेची गरज नाही. मी सुरक्षेबाबत कोणाशीही बोलत नाही. या देशात सर्व गुन्हे दारूच्या नशेत होतात. गृहमंत्र्यांना हे माहीत नसेल तर ती अत्यंत गंभीर बाब आहे, असा आरोपही त्यांनी केला.
MP Sanjay Rut on Sambhajinagar Riot Politics Allegation