मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत कधी काय बोलतील याचा भरवसा नाही. तसेच ते काय करतील याचादेखील कुणी अंदाज बांधू शकत नाही. त्यांच्या या अशा वागण्याचा उत्तम नमुना पुढे आला आहे. स्वत:च सुरक्षा वाढविण्यासाठी राऊत यांनी धमकीचा बनाव केल्याच उघड झाले आहे. या प्रकरणातील आरोपी मयुर शिंदे याला अटक केल्यानंतर हे संपूर्ण गुपित पुढे आले आहे.
मागील काही महिन्यांमध्ये राज्यातील मोठ्या नेत्यांना धमकीचे फोन आल्याच्या घटना घडल्यात. त्यामध्ये संजय राऊत यांचादेखील समावेश होता. संजय राऊत यांचे बंधू आणि भांडुप मतदारसंघाचे आमदार सुनील राऊत यांच्या मोबाइलवर धमकीचा फोन आला होता. एका अज्ञात व्यक्तीने हा फोन सुनील राऊतांना केला होता. सुनील राऊतांनी फोन उचलताच सकाळी ९ वाजताचा भोंगा बंद करा, अन्यथा महिनाभरात तुम्हा दोघांनाही गोळ्या घालू अशी थेट धमकी या अज्ञात व्यक्तीने संजय राऊतांना आणि सुनील राऊतांना दिली.
दरम्यान, शरद पवार, संजय राऊत धमक्यांच्या सत्रानंतर सरकारवर विरोधकांनी टीकेची उठवली. तसेच राऊतांनी मुंबई पोलिस आयुक्तांकडे याबद्दल सविस्तर माहिती दिली. त्यानंतर या प्रकरणातील आरोपी असलेल्या मयुर शिंदे याला पोलिसांन अटक केली. त्यातून धमकी दिल्याचा स्वत:च बनाव केल्याची माहिती पुढे आली आहे. मुख्य म्हणजे मयुर शिंदे हा राऊत यांचा निकटवर्तीय असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला नवीन वळण आले आहे. तसेच खरोखर राऊत यांनी बनाव केल्याचे सिद्ध झाल्यास धमकी प्रकरण ठाकरे गटावर उलटणार आहे.
सुनील राऊतांकडे करतो काम
सुनील राऊत यांच्याशी जवळचे संबंध असलेला मयुर शिंदे हा त्यांच्याचकडे अनेक वर्षांपासून काम करतो. तो कायम त्यांच्यासोबत असतो. मुलुंड, भांडुप, विक्रोळी परिसरात त्याचा दबदबा आहे. सध्या मयुर शिंदे एका वेगळ्या पक्षासाठी काम करत असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.
संजय राऊत यांनी दिली ही प्रतिक्रीया
याप्रकरणी खासदार राऊत यांनी प्रतिक्रीया दिली आहे. ते म्हणाले की, हे महाशय (मयूर शिंदे) सध्या भाजपा किंवा मिन्धे गटात असल्याचे समजले. कधी काळी जवळ असलेल्या व्यक्तींचा वापर केला जातो. एकनाथ शिंदे या जवळच्या व्यक्तीस पकडून शिवसेनेचा काटा काढण्याचा प्रयत्न झाला तसा.. राजा ठाकूर प्रकरण फसल्यावर हे घडवले काय? काही विषय संवेदनशील असतात. याचे भान नसलेले लोकच असे बोलू आणि लिहू शकतात.