मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना थू – थू करीत थुंकून शिंदे गटा संदर्भात आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात या घटनेचे पडसाद उमटत आहेत. त्यातच पुन्हा राऊत यांनी अजित पवार यांच्याबद्दलही कठोर शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केल्याने आता या संदर्भात अजित पवार काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते, परंतु अजित दादा यांनी मनाचा मोठेपणा दाखवत आणि समजूतीने या प्रकरणावर पडदा टाकला आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील अशा घटनांबाबत प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार देत, महाराष्ट्रात अनेक महत्त्वाचे प्रश्न असून त्याकडे माझे लक्ष आहे, किरकोळ गोष्टींकडे मी लक्ष देत नाही, अशी भावना व्यक्त केली आहे.
शरद पवार म्हणाले…
खासदार संजय राऊतांना पत्रकार परिषदेत खासदार श्रीकांत शिंदेंविषयी एक प्रश्न विचारण्यात आला. हे ऐकून राऊत थुंकले. ऑन कॅमेरा थुंकल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यांच्या या कृत्यावरून सध्या राज्यातील राजकारण तापलेले असून त्याचे राज्यभर पडसाद उमटत आहेत. या वादावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार पुण्याच्या दौऱ्यावर असून एका सभेनंतर माध्यमांशी संवाद होते. यावेळी शरद पवार यांना राऊत थुंकल्याबाबत प्रश्न विचारला असता शरद पवारांनी स्पष्टपणे बोलण्यास नकार दिला. तसेच पवार म्हणाले की , मला वाटत हे काही राष्ट्राचे, राज्याचे प्रश्न नाहीत. मी त्यावर भाष्यदेखील करू इच्छित नाही आणि त्याला महत्त्वही देऊ इच्छित नाही.
अजित पवार म्हणाले…
शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्याबाबत प्रश्न विचारताच शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे माध्यमांसमोर थुंकले. त्यावरून अजित पवार यांनी संजय राऊत यांना बोलताना तारतम्य बाळगण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे राऊत आणि अजित पवार यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगली होती. धरणात मुतण्यापेक्षा थुंकलेले बरे! असे राऊत म्हणाले. तर राऊत काहीही बोलल्याने आमच्या अंगाला भोकं पडत नाहीत, असे अजित दादा यांनी प्रत्युत्तर दिले होते. त्याचवेळी मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरे यांना जास्त जागा मिळतील, असा विश्वासही अजित पवार यांनी व्यक्त केला.
नागपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, संजय राऊत हे मोठे नेते आहेत, ते राज्यसभेचे खासदार आहेत. माझे त्यांच्याबद्दल काहीच म्हणणे नाही, मी माझ्या कार्यकर्त्यांना सर्व समजावून सांगितले आहे. तुम्ही काळजी करू नका, असे म्हणत अजित दादा यांनी अखेर संजय राऊत यांच्याबद्दलच्या विषयावर पडदा टाकला. त्याचप्रमाणे गद्दारी करूनच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, अशी टीका देखील पवारांनी केली.
MP Sanjay Raut Sharad Pawar Ajit Pawar Politics