विशेष प्रतिनिधी, मुंबई
महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्रीपदाचा नक्की फॉर्म्युला काय आहे, याची सर्वत्र उत्सुकता आणि चर्चा आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्री असेल का, अशी चर्चाही रंगत आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून सेना खासदार संजय राऊत यांनी रोखठोकपणे मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला सांगितला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पावर आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मराठा आरक्षणासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नुकतीच नवी दिल्ली येथे भेट घेतली. त्यादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांसोबत अर्धा तास वैयक्तिक चर्चा केली. या भेटीमुळे राज्याच्या राजकारणत पुन्हा वादळ उठले आहे. मोदी-ठाकरे भेटीत काय ठरले, महाविकास आघाडीत सर्व अलबेल आहे काय अशा चर्चा राज्याच्या राजकारणात रंगू लागल्या. परंतु शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षांना सत्ता टिकवणे गरजेचे आहे. सरकार कोणत्याही कारणाने कोसळणार नाही, याबाबत शिवसेना खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी रोखठोक या सदरातून आज वेध घेतला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली भेटीमुळे राज्यात राजकीय समीकरणे बदलतील अशा पुड्या सोडल्या जात आहेत. राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्रिपदावर दावा सांगितला जाईल आणि तेथेच वादाची ठिणगी पडेल अशा वावड्या पसरवल्या जात आहेत. त्यात काहीही तथ्य नाही. शिवसेनाला मुख्यमंत्रिपद पाच वर्षांसाठी दिलेला शब्द आहे, त्यामुळे तेच पाच वर्षे पदावर कायम राहतील असे राऊत यांनी स्पष्ट केले. राज्यातील तीनही पक्षात चांगला समन्वय आहे. मुख्यमंत्री स्वतंत्र काम करत आहेत. त्यात राष्ट्रवादी आणि काँग्रसेचा हस्तक्षेप नाही.राज्यातील सत्ता चालवणे आणि टिकवणे ही आघाडीतील तीनही पक्षांची गरज आहे, असे संजय राऊत लिहितात.
केंद्रासह अनेक राज्यात भाजपची सत्ता आहे. महाराष्ट्रासारखे राज्य हाती नसल्याने इतर राज्ये हाती असूनही जीव रमत नाही. काँग्रेसकडे एखाद-दुसरे राज्य आहे. पण राज्यातील सर्वात महत्त्वाचा पक्ष आहे. राष्ट्रवादी राज्याबाहेर विस्तारली नाही. हिंदुत्वाचा मोठा बँड ठरूनही शिवसेनेला महाराष्ट्राबाहेर मोठी झेप घेता आली नाही. त्यामुळे राज्याची सत्ता टिकवणे तीनही पक्षांना आवश्यक आहे. मुख्यमंत्री ठाकरे आणि पंतप्रधान यांच्यात थेट संवाद वाढला आहे. ईडी, सीबीआयसारख्या यंत्रणांचा वापर करून एखाद-दुसरा आमदार गळाला लागेल, परंतु बहुमताचा आकडा जमणार नाही, हे सत्य विरोधकांनी स्वीकारावे. सत्ता बदलण्याचा एकही पर्याय यशस्वी होण्याची शक्यता आज तरी नाही.
भाजप-शिवसेना सरकार आलेच असते. त्यात शिवसेना पुन्हा दुय्यम भूमिकेत सहभागी झाली असती तर त्यात नवे काय घडले असते? पण शिवसेनेचा मुख्यमंत्री असलेल्या सरकारमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी झाले, हे चित्र कलाटणी देणारे ठरले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार बनत असताना पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी त्यात कधीच अडथळे आणण्याचा प्रयत्न केला नाही. याचा अर्थ राज्यातील भाजपच्या नेत्यांनी कधीच समजून घेतला नाही.
कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तम नेतृत्व केले आहे. जगात त्याचे कौतुक झाले. मुख्यमंत्री म्हणून ठाकरे यांची प्रतिम उत्तम आहे. सगळे चांगले चालले असताना बसलेली घडी विस्कटण्याचा विचार कोण करेल? दिल्लीच्या भेटीचे कवित्व हे फक्त बुडबुडेच आहेत. मोदी-ठाकरे भेटीचे फलित वर्तमानापेक्षा भविष्याचा वेध घेणारेच आहे, असे संजय राऊत यांनी शेवटी म्हटले आहे.