मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना उद्धव गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्यावर भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. संजय राऊत हे साप आहेत आणि ते उद्धव ठाकरेंचा विश्वासघात करणार आहेत. संजय राऊत हे येत्या १० जूनला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचीही भविष्यवाणी नितेश यांनी केली आहे.
पत्रकारांशी बोलताना नितेश राणे म्हणाले की, आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार आहे. संजय राऊत १० जून रोजी राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. संजय राऊत यांचा अजित पवारांना विरोध असून पवारांनी पक्ष सोडल्यास राऊत हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचा दावाही राणे यांनी केला.
राणे पुढे म्हणाले की, ‘मला मिळालेल्या माहितीनुसार संजय राऊत हे शरद पवारांच्या मागे लागले आहेत. लवकरच ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांनी घाईघाईत हा निर्णय घेतला आहे. संजय राऊत यांनी अजित पवारांना नेहमीच विरोध केला आहे. त्यामुळे त्यांची एकच अट आहे, अजित पवारांनी पक्ष सोडल्यास ते राष्ट्रवादीत येतील. संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांना राजकीयदृष्ट्या संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राणेंनी केला.
राणे म्हणाले की, “नजिकच्या काळात संजय राऊत हे राष्ट्रवादीच्या मंचावर दिसणार आहेत. शरद पवार यांच्या राजीनाम्यावर सर्व विरोधी पक्षनेत्यांनी शरद पवार यांची भेट घेऊन राजीनामा न देण्यास सांगितले. पण उद्धव ठाकरेंनी त्यांना फोन केल्याचे किंवा राजीनामा देऊ नका असे मी कुठेही वाचले नाही किंवा पाहिले नाही. त्यामुळे संजय राऊत हे उद्धव ठाकरेंना राजकीय मार्गाने संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. मला उद्धव ठाकरेंना एवढेच सांगायचे आहे की संजय राऊत हा साप आहे.
दरम्यान, नितेश राणेंच्या दाव्यावर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे म्हणाले की, भाजप नेत्याला अशी विधाने करण्यासाठी ‘पैसे’ दिले जातात.
MP Sanjay Raut Join NCP MLA Nitesh Rane Claim