नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण, त्यांच्याविरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. आता या प्रकरणी राऊत यांना अटक होणार की आणखी पुढे काय होणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
खासदार राऊत हे दोन दिवसापूर्वी नाशिकच्या दौऱ्यावर आले होते. ठाकरे गटाचे आमदार किशोर दराडे यांच्या मुलाचे लग्न त्र्यंबकरोडवरील रिसॉर्टमध्ये होते. त्यावेळी राऊत नाशकात आले होते. आणि त्याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा याच लग्नाला आले होते. खास म्हणजे, राज्यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने अंतिम निकाल त्याचदिवशी जाहीर केला होता. हा निकाल दुपारी साडेबाराच्या सुमारास आला आणि त्यानंतर सायंकाळी चार वाजेच्या सुमारास शिंदे व राऊत नाशिकमध्ये होते.
याच दौऱ्यात खासदार राऊत यांनी एक विधान केले होते. त्याची दखल नाशिक पोलिसांनी घेतली आहे. राऊत म्हणाले होते की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, शिंदे सरकार हे बेकायदेशीर आहे. त्यामुळे सरकारी यंत्रणांनी सरकारचे कुठलेही आदेश पाळू नयेत, असे आवाहनही त्यांनी केले होते. ही बाब कायद्याचे उल्लंघन करणारी असल्याचे नाशिक पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळेच मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येथील शासकीय विश्रामगृहावर दोन दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी संजय राऊत म्हणाले होते की, हे सरकार तीन महिन्यांत जाणार आहे. हे बेकायदेशीर सरकार आहे. सरकारचे आदेश सरकारी यंत्रणांनी पाळू नये, असे आवाहन त्यांनी केले. मुंबई नाका पोलिस स्टेशनचे हवालदार केदारे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यावरुन भारतीय दंड संहिता कलम 505/1 (ब) तसेच पोलिसांप्रती अप्रितीची भावना, चिथावणे (१९२२ कायदा) यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
MP Sanjay Raut FIR booked Nashik Police