नाशिक – रेमडेसिवीर उत्पादित करणाऱ्या अनेक कंपन्यांशी संपर्क करुन हे इंजेक्शन नाशिक जिल्ह्यातील रुग्णांसाठी कसे उपलब्ध करता येईल याकडे लक्ष केंद्रित केले. त्याच बरोबर केंद्राच्या आरोग्यविभागाकडे ही सातत्याने याचा पाठपुरावा केला.गुजरात, कर्नाटक येथील उत्पादकांशी चर्चा करून शेवटी बंगलोर येथील मायलान कंपनीचे नरेश हसीजा यांनी विनंतीला मान देऊन एक हजार इंजेक्शन हे नाशिक जिल्ह्यातील कोरोना रूग्णालयांसाठी उपलब्ध करून दिले आहे. त्याची प्रक्रिया पूर्ण करत बंगलोर येथून हे इंजेक्शन नाशिक येथे दाखल झाले. जिल्हाधिकारी कार्यालयातून नाशिक जिल्ह्यातून मागणी केलेल्या कोविड रुग्णालयांना त्यांच्या पेशंटच्या संख्येनुसार हे रेमडेसिवीर दिले जाणार असल्याची माहिती खा. डॉ. भारती पवार यांनी दिली.
केंद्र सरकारची व जिल्हाधिकारी तथा त्यांच्या टीमने योग्य नियोजन केले. तसेच रेमडेसिवीर लवकरात लवकर नाशिकला उपलब्ध होण्यासाठी FDA चे सह संचालक भामरे यांच्याशी रेमडेसिवीर इंजेक्शन कोरोना बाधित रुग्णांना उपलब्ध व्हावे म्हणून चर्चा केली. याचाच परिणाम म्हणून आज हे एक हजार रेमडेसिवीर इंजेक्शन नाशिक जिल्ह्यासाठी उपलब्ध करून जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांचेकडे सुपूर्द केल्याचेही खा. पवार यांनी सांगितले.