भोपाळ : मध्यप्रदेशात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे, परंतु संपूर्ण लॉकडाउन हे या समस्येचे निराकरण नाही. त्यामुळे संपूर्ण राज्यात लॉकडाउन होणार नाही. तर स्थानिक प्रशासनाने निर्णय घेतलेल्या शहरांमध्ये कर्फ्यू असून यात अनेक प्रकारची सूट देण्यात आहे, अशी माहिती मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री चौहान म्हणाले की, आपत्ती व्यवस्थापन गटांनी अनेक निर्णय घेतले आहेत. काही दिवसांपासून लोकांची गर्दी असणार्या ठिकाणी प्रतीबंध करण्यात येईल. परंतु आर्थिक उपक्रम चालू ठेवले पाहिजेत, जेणेकरून लोकांच्या रोजीरोटीवर परिणाम होणार नाही. लोकांनी कर्फ्यूचे अनुसरण केल्यास संसर्ग नियंत्रित केला जाऊ शकतो.
मुख्यमंत्री चौहान यांनी पुढे सांगितले की, कोरोना संसर्ग रोखणे महत्वाचे आहे.जनता कर्फ्यूसारखे उपाय संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी प्रभावी आहेत. यामुळेच काही शहरांनी स्थानिक स्तरावर जनता कर्फ्यू निश्चित केला आहे. आणि जनताही यात सहकार्य करीत आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, ऑक्सिजनची कमतरता नाही. गरजेपेक्षा जास्त ऑक्सिजन पुरवठा आहे. राज्यात सध्या दररोज सुमारे २४४ टन ऑक्सिजन येत आहे. सरकार यंत्रणेत कोणतीही कमतरता सोडणार नाही, परंतु लोकांचे उत्स्फूर्त सहकार्य आवश्यक आहे.
रेमाडेसिविर इंजेक्शन पुरवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. जिल्हा रुग्णालयांमध्ये वाटप केले जातील. जास्त किंमतीला रेमाडेसिविर इंजेक्शनची विक्री रोखण्यासाठी व काळाबाजार रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. राज्यात सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये जास्तीत जास्त रुग्ण आहेत. त्यांच्यासाठी स्वतंत्र इंजेक्शन बॉक्स दिले गेले आहेत. राज्यात पुरेसे कोविड केअर सेंटर बनविण्यात आले आहे. ज्यांना कोरोना लक्षणे असतात आणि घरात एकटे राहण्याची जागा नाही त्यांना येथे ठेवले जाईल.