मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर हनुमान चालिसाचे पठण करण्याचे घोषित करुन सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या राणा दाम्पत्याविरोधात देशद्रोहाचा गुन्बा नोंदविण्यात आला आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना वांद्रे न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. राणा दाम्पत्याला पोलिसांनी काल रात्री अटक केली होती. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले.
सामाजिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी पोलिसांनी राणा दाम्पत्यावर गुन्हा दाखल केला होता. दोन्ही बाजूचा युक्तीवाद झाल्यानंतर न्यायालयाने राणा दाम्पत्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दोघांच्या जामीनावर येत्या २९ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर रवी राणा यांना आर्थर रोड तर नवनीत राणा यांना भायखळा कारागृहात नेण्यात आले आहे.
न्यायालयात युक्तीवादावेळी सरकारी वकीलांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठणाचे खुले आव्हान राणा दाम्पत्याने दिले. याप्रकरणी त्यांना नोटीस देण्यात आली. तरीही त्यांनी मुख्यमंत्र्यांबाबत अपशब्द वापरले. तसेच, आव्हानही दिले. त्यामुळे त्यांचा अप्रामाणिक हेतू असल्याचे सिद्ध झाले. त्याशिवाय समाजात तेढ निर्माण करुन अशांतता पसरवणे आणि कायदा व सुव्यवस्था बाधित केल्याने त्यांच्या विरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल केल्याचे वकीलांनी सांगितले. राणा दाम्पत्याची सखोल चौकशी करण्यासाठीच ७ दिवसांची पोलिस कोठडी मागण्यात आली. मात्र, न्यायालयाने राणा यांच्या वकीलाची बाजू ऐकून घेतल्यानंतर १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.