मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या अडचणी वाढल्या आहेत. जात प्रमाणपत्रा साठी शाळा सोडल्याचा बनावट दाखला दिल्याचा आरोप अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार नवनीत राणा यांच्यावर लावण्यात आला आहे. नवनीत राणा यांच्या वडिलांनी फसवणूक करुन प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे. त्यामुळे राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्या नंतर राणा आणि त्यांच्या वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खासदार नवनीत राणा या नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असतात काही महिन्यांपूर्वी आणि हनुमान चालीसा प्रकरणामुळे त्यांना अटक करण्यात आली होती, पुन्हा एकदा नवनीत राणा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणी नवनीत राणा यांच्याविरोधात अजामीनपत्र वॉरंट काढण्यात आले आहे. तसेच पोलिसांनाही कारवाई करण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत. शिवडी कोर्टाने याबाबचे आदेश पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे आता नवनीत राणा यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. खासदार नवनीत राणा यांनी बोगस जात प्रमाणपत्रा प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयात दाद मागितली होती, परंतु सत्र न्यायालयाने कारवाईला स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे आता शिवडी कोर्टाने महत्त्वपूर्ण आदेश दिल्यामुळे नवनीत राणांच्या अडचणीत वाढ झाली आहे. शिवडी महानगर दंडाधिकारी कोर्टाने पोलिसांनी अजामीनपात्र वॉरंट काढत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, आता मुलुंड पोलीस नवनीत राणांविरोधात अजामीनपात्र वॉरंटवर नेमकी काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयाने दि. ८ जून २०२१ रोजी रद्द केला असून त्यांना दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. विशेष म्हणजे उच्च न्यायालयाच्या या निकालामुळे नवनीत राणा यांची खासदारकी धोक्यात आली होती. कारण नवनीत राणा यांनी निवडणूक अर्जासोबत दिलेल्या शपथपत्रात अनुसूचित जमातीबाबत दिलेले प्रमाणपत्र बोगस आहे. त्यांनी जात प्रमाणपत्र समितीसमोरही त्यांच्या जातीचा खोटा दावा केला आहे, असा आरोप याचिकाकर्त्यांनी केला होता.
नवनीत राणा यांनी मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. त्यानंतर आता नवनीत राणा यांच्या वडिलांविरोधात गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्यांनी फसवणूक करुन जात प्रमाणपत्र मिळवले, असा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाल्याने राणा यांच्याबद्दल विरोधी पक्षाचे नेते आणि पदाधिकारी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत.
MP Navneet Rana Arrest Warrant