इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या निवासस्थानी काल इंडिया आघाडीतील घटक पक्षांची बैठक झाली. या बैठकीला उध्दव ठाकरे यांच्यासह ठाकरे गटाचे संजय राऊत, आदित्य ठाकरे उपस्थित होते. या बैठकीत राहुल गांधी यांनी मतदार याद्यांमधील घोळ आणि निवडणूक आयोगासंदर्भातील प्रेझेंटेशन दिले. त्यावेळी उध्दव ठाकरे, संजय राऊत व आदित्य ठाकरे हे शेवटच्या रांगेत बसल्याने शिवसेना शिंदे गटाचे खा. नरेश म्हस्के यांनी एक ट्विट करत काही फोटो शेअर केले आहे.
या ट्वीट मध्ये त्यांनी म्हटले आहे की, आरे आरे आरे, काय तुमची ही किंमत उद्धव ठाकरे…शिवरायांचा वारसा सांगता ना रे…खांग्रेसच्या मीटिंगमध्ये जाऊन शेवटच्या रांगेत बसलात रे???? बाळासाहेबांनी आम्हाला आत्मसन्मान, स्वाभिमान शिकवला अपमानाविरुद्ध पेटून उठायचा शिवरायांनी आणि बाळासाहेबांनी धडा दिला तुम्ही यातलं काहीच घेतलं नाही का रे??
काँग्रेसने तुमची काय ही अवस्था करून ठेवली आहे आदित्य ठाकरे….तुमच्यापेक्षा एकेक खासदार वाले पक्ष बरे त्यांना सुद्धा पुढच्या रांगेत बसवलं रे, महाराष्ट्राची दिल्लीत जाऊन तुम्ही पार लाज घालवलीत रे…थोडा जरी स्वाभिमान आत्मसन्मान शिल्लक असेल तर जरा तरी पेटून उ(बा)ठा ना रे महाराष्ट्राची किंमत कोणी कुठे वाढवली ते जरा दुसऱ्या फोटोंत बघा रे…..
तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी मुंबईत बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाऊन त्यांनी बाळासाहेबांना वंदन करुन या घटनेकडे लक्ष वेधले आहे.
या टिकेनंतर खा. संजय राऊत यांनी सुध्दा प्रतिक्रिया दिली आहे. मी स्वत. तिथे होतो. कमल हसन होते. शरद पवार देखील आमच्या सोबत बसले होते. प्रमुख नेत्यांना पुढे बसवले होते. पण, उध्दव ठाकरे म्हणाले इथून दिसणार नाही. त्यामुळे ते मागे आले होते. असे संजय राऊत म्हणाले.