इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मध्य प्रदेशातील कुबेरेश्वर धाम येथील रुद्राक्ष महोत्सव सध्या देशभरात चर्चेचा ठरला आहे. या महोत्सवात आलेल्य दोन महिला आणि एका तीन वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. त्यात महाराष्ट्रातील एका महिलेचा समावेश आहे. आणि आज, शुक्रवारी एक महिला आणि तीन वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील जळगाव येथून आई-वडील मुलासह कुबेरेश्वर धाम येथे आले होते. मुलाची तब्येत बिघडली होती, चालताना तो अधिकच आजारी पडला, त्यानंतर पालकांनी त्याला जिल्हा रुग्णालयात नेले, तेथे शुक्रवारी त्याचा मृत्यू झाला. तेथे आणखी एका महिलेचाही मृत्यू झाला. बिघडलेली परिस्थिती पाहता रुद्राक्ष वाटप तूर्तास बंद करण्यात आले आहे.
मध्य प्रदेशातील सिहोर जिल्ह्यात असलेल्या कुबेरेश्वर धाममध्ये कथाकार पंडित प्रदीप मिश्रा शिवकथा सांगण्याबरोबरच रुद्राक्षाचेही वाटप करत आहेत. अनियंत्रित गर्दी पाहता गुरुवारी दुपारी १२ वाजल्यापासून रुद्राक्ष वाटप बंद करण्यात आले. आज म्हणजेच शुक्रवारी रुद्राक्ष वाटपाच्या दुसऱ्या दिवशीही बंद ठेवण्यात आले आहे. गुरुवारी कुबेरेश्वर धाम येथे अफाट गर्दी झाली होती. त्यामुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यात महाराष्ट्रातील एका महिलेचा मृत्यू झाला होता.
१० लाख भाविक कुबेरेश्वर धाममध्ये
रुद्राक्ष प्राप्त करण्याच्या इच्छेने देशाच्या विविध भागातून तब्बल १० लाखांहून अधिक भाविक कुबेरेश्वर धाममध्ये पोहोचले आहेत. भाविकांच्या या संख्येमुळे येथील सर्वच यंत्रणा कोलमडली. प्रशासनाचा आणि आयोजकांचा अंदाज चुकला. त्यामुळे सर्वच तयारी अपूर्ण पडली. अखेर सततच्या गर्दीमुळे प्रशासनाला येथील व्यवस्था सुरळीतपणे सांभाळता येत नसल्याचे चित्र आहेय कुबेरेश्वर धाममध्ये १६ ते २२ फेब्रुवारी दरम्यान रुद्राक्ष वाटप आणि शिवकथेचे आयोजन करण्यात येणार होते, मात्र सध्या वाढती गर्दी पाहता रुद्राक्ष वाटप थांबवण्यात आले आहे. सिहोर जिल्ह्यातील परिस्थिती अशी आहे की, स्थानक ते बसस्थानक आणि कुबेरेश्वर धाम परिसरात पाय ठेवायला जागा नाही. तिकडे भोपाळ-इंदूर महामार्गावर गुरुवारी सकाळपासून अनेक किलोमीटर वाहतूक कोंडी आहे. गुरुवारी रात्री उशिरा सुमारे १५ किमीची कोंडी होती. कुबेरेश्वर धाम गाठणाऱ्या भाविकांचा मोठ्या प्रमाणात जल्लोषात सहभाग होता.
सुमारे चार लाख रुद्राक्षांचे वाटप
रुद्राक्ष वाटप १६ फेब्रुवारीपासून होणार होते, मात्र १५ फेब्रुवारीलाच सुमारे एक लाख लोक रुद्राक्ष घेण्यासाठी कुबेरेश्वर धामवर पोहोचले, त्यानंतर समितीने एक दिवस आधीच रुद्राक्ष वाटप सुरू केले. १५ फेब्रुवारी रोजी सुमारे एक लाख रुद्राक्षांचे वाटप करण्यात आले. दुसरीकडे गुरुवारी रुद्राक्ष वितरण थांबण्यापूर्वी सुमारे साडेतीन लाख रुद्राक्षांचे वाटप होणार असल्याचे सांगण्यात आले. दोन दिवसांत चार लाखांहून अधिक रुद्राक्षांचे वाटप झाल्याचा दावा केला जात आहे.
संतप्त भाविकांकडून तोडफोड
रुद्राक्ष ग्रहण करण्यासाठी देशातील विविध शहरातून आलेल्या भाविकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कसेबसे भाविक कुबेरेश्वर धाम येथे पोहोचत आहेत. गुरुवारीच अपेक्षेपेक्षा जास्त भाविक पोहोचल्याने व्यवस्था ढासळली. रुद्राक्ष न मिळाल्याने संतप्त भाविकांनी ३२ काउंटरची तोडफोड केली, तसेच व्यवस्थेसाठी लावलेले बांबूही उखडून टाकले. अनेक तास रांगेत उभे राहिल्याने सुमारे सात हजार नागरिकांची प्रकृती खालावली, त्यांना कुबेरेश्वर धाम येथे उभारण्यात आलेल्या आरोग्य शिबिराव्यतिरिक्त जिल्हा रुग्णालयात दाखल करावे लागले.
सगळीकडे गर्दीच गर्दी
सिहोरची सद्यस्थिती अशी आहे की, स्टेशनपासून बसस्थानकापर्यंत फक्त भाविकच भाविक आहेत. स्थानकात पाय ठेवायलाही जागा नाही. त्यामुळे बसमध्येही माणसेच माणसे आहेत. इंदूर-भोपाळ महामार्गावर सुमारे १५ ते २० किमी लांब वाहनांच्या रांगा आहेत. रुद्राक्ष घेण्यासाठी भाविक आपापल्या वाहनाने आले. त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली.
मोबाइल नेटवर्क ठप्प
लाखो भाविक एकत्र आल्याने मोबाईल नेटवर्क कोलमडले आहे. भाविक त्यांच्या प्रियजनांपासून वेगळे होत आहेत आणि नंतर ते त्यांना शोधू शकत नाहीत. त्यामुळे ज्यांनी सोबत रोख रक्कम आणली नाही त्यांना पाणीही विकत घेता येत नाहीय. नेटवर्कच्या समस्यांमुळे अनेक जण कॅशलेस व्यवहार करू शकत नाहीत. पैसे चोरीला जाण्याच्या भीतीने मोठ्या संख्येने भाविकांनी जास्त रोकड सोबत आणली नाही आणि आता त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
झोपायलाही जागा नाही
भाविक दिवसा रुद्राक्ष मिळविण्यासाठी धडपडत असताना रात्रीही शांतता मिळत नाही. कुबेरेश्वर धाम समितीला सुमारे पाच ते सहा लाख भाविक येण्याची अपेक्षा होती, ती लक्षात घेऊन त्यांनी तयारी केली होती. मात्र अपेक्षेपेक्षा जास्त भाविक आल्याने परिस्थिती बिकट झाली आहे. भाविकांसाठी बनवलेले डोम पूर्णपणे भरले आहे. त्यामुळे भाविकांना साड्या, बेडशीट पसरून उघड्यावर रात्र काढावी लागली. त्याचवेळी जिल्हाधिकारी सांगतात की, शिवकथा कार्यक्रमासाठी कुबेरेश्वर धाम समितीने परवानगी घेतली होती आणि सुमारे सहा लाख भाविक येणे अपेक्षित होते, प्रशासनाने दहा लाख भाविक येण्याची व्यवस्था केली असली तरी भाविकांची ये-जा थांबली नाही, त्यामुळे व्यवस्था ठप्प झाली आहे.
नेपाळमधील रुद्राक्षापासून बनवलेले शिवलिंग
कुबेरेश्वर धाम येथील भव्य कार्यक्रमाचे हे दुसरे वर्ष आहे. नेपाळमधून ५० लाखांहून अधिक रुद्राक्ष भाविकांसाठी आणण्यात आले आहेत. त्यांच्यापासून सहा फूट उंचीचे शिवलिंग तयार करण्यात आले आहे. कथास्थळाजवळ उभारलेल्या काउंटरमधून या आमंत्रित रुद्राक्षांचे सात दिवस चोवीस तास वाटप करण्यात येणार होते, मात्र, बिघडलेली परिस्थिती पाहता ते थांबवण्यात आले आहे.
MP Kubereshwar Dham Rudraksha Mahotsav Status