इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भ्रष्टाचार ही जूण काही भारतीय प्रशासन व्यवस्थेला लागलेली कीड आहे. अगदी वरपासून खालपर्यंत भ्रष्टाचाराने संपूर्ण यंत्रणा पोखरली आहे. त्यामुळे अगदी गाव पातळीवर असलेल्या एखाद्या तलाठ्याकडे देखील कोट्यावधीची संपत्ती सापडते, तेव्हा सर्वांचे डोळे पांढरे होतात. मध्यप्रदेशात इंदूर नजिक अशीच घटना घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
खरगोन जिल्ह्यात कार्यरत असलेला तलाठी जितेंद्र सोलंकी याच्याकडे उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती असल्याची तक्रार आल्यानंतर इंदूर लोकायुक्तांनी तलाठ्याच्या गौरीधाम येथील घरासह ४ ठिकाणी धाड टाकली. यावेळी तपासात तलाठ्याच्या घरी ४ लाखांची रोकड, सोने-चांदी, तसेच इंदूर शहरात ६ दुकाने व १ फ्लॅट, खरगोनमध्ये दुकान, ईश्वरीनगर येथे ३ मजली घर, १ चारचाकी त्याचसोबत अन्य मालमत्ता आढळून आली.
या भ्रष्ट तलाठ्याविरोधात तक्रार मिळाल्यानंतर इंदूर येथील लोकायुक्त डीएसपी संतोष भदौरिया आणि प्रविण बघेल यांच्या नेतृत्वात तपास यंत्रणेच्या २२ अधिकाऱ्यांच्या पथकाने एकाचवेळी ४ ठिकाणी धाड टाकली. रात्री ३ वाजता तलाठी जितेंद्र सोलंकी याच्या गोगांवा येथील घरी धडक दिली. छापेमारीत अधिकाऱ्यांना आढळून आलेली मालमत्ता पाहून अनेकांनी तोंडात बोटे घातली.
https://twitter.com/Bharat24MPCG/status/1651465390025998337?s=20
गेल्या २६ वर्षापासून तलाठी म्हणून कार्यरत असलेल्या सोलंकी यांच्याकडे इतकी संपत्ती आली कशी ? एखाद्या तलाठ्याचे वार्षिक उत्पन्न साधारणतः ५ लाख असू शकते, मग ही बेनामी संपत्ती कोणाची? या संदर्भात सखोल चौकशी करण्यात येत आहे. उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता असल्याने आता या प्रकरणाची पुढील कार्यवाही सुरू झाली आहे.
सध्या सोलंकी यांच्याकडे सापडलेल्या मालमत्तेची यादी बनवली जात आहे. छापेमारीच्या वेळी तपास पथकाने इतक्या मोठ्या प्रमाणात संपत्ती जप्त केली. परंतु अद्याप सोलंकी यांचे बँक खाते आणि लॉकर याचीही चौकशी बाकी आहे. दरम्यान देशभरातील अनेक राज्यात तलाठी व इतर अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची अशी चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.
https://twitter.com/Nitinreporter5/status/1651595910948990977?s=20
MP Khargone Talathi Raid 4 Bungalows Property Wealth