इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मध्य प्रदेशातील इंदूर येथून अतिशय धक्कादायक वृत्त समोर आले आहे. बीएम कॉलेजच्या प्राचार्याला विद्यार्थ्याने पेट्रोल टाकून जाळल्याचा हा संतापजनक प्रकार आहे. प्राचार्यांची प्रकृती गंभीर आहे. महिला प्राचार्या विमुक्ता शर्मा या कॉलेजच्या फार्मसी विभागात प्राचार्या आहेत. ही घटना आज सायंकाळी घडली. या घटनेमुळे शैक्षणिकसह अन्य क्षेत्रातही खळबळ उडाली आहे.
कॉलेजचे काम आटोपून प्राचार्य शर्मा या घरी निघाल्या होत्या. ती गाडीत बसत असतानाच एका विद्यार्थ्याने त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना पेटवून दिले. काही क्षणातच हा प्रकार घडल्याने पाहता पाहता प्राचार्या आगीत होरपळल्या. महाविद्यालयातीलच आशुतोष श्रीवास्तव या विद्यार्थ्याने हे भयंकर कृत्य केले आहे. घटनास्थळी उपस्थित लोकांनी तात्काळ प्राचार्यांची आगीतून सुटका करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केले. सध्या प्राचार्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. प्राचार्या ८० टक्के भाजल्या असून विद्यार्थी २० टक्के भाजला आहे. परीक्षेत नापास झाल्याचा राग आशुतोषला आला. त्यातूनच त्याने हे कृत्य केले आहे. पोलिसांनी आशुतोषला ताब्यात घेतले आहे.
यापूर्वीही गुन्हे
सिमरोल पोलिस स्टेशनचे अधिकारी आरएनएल भदौरिया यांनी सांगितले की, विद्यार्थ्याने यापूर्वीही कॉलेजमध्ये अशा घटना घडवून आणल्या आहेत. त्याच्यावर कोयत्याने वार केल्याचाही गुन्हा दाखल आहे. कॉलेजचे प्राध्यापक विजय पटेल यांच्यावरही त्याने चाकूने हल्ला केला होता. पोलिसांचे पथक महाविद्यालयातून पुरावे गोळा करत असून घटनास्थळी उपस्थित लोकांची चौकशी केली जात आहे.
MP Indore Crime Student Principal Petrol Burn Fire