नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील इंदिरानगर, राणेनगर, लेखानगर, दिपालीनगर या भागातील वाहतूकीच्या कोंडीवर मात करण्यासाठी इंदिरानगर आणि राणेनगर येथील बोगद्याची लांबी वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठीचा प्रस्ताव खासदार हेमंत गोडसे यांनी आज केंद्राकडे सादर केला आहे. या दोन्ही बोगद्यांची लांबी प्रत्येकी पंधरा मीटरने वाढवून प्रत्येकी बोगदा चाळीस मीटर लांबीचा करावा, अशी मागणी गोडसे यांनी पत्रात केली आहे.
राणेनगर आणि इंदिरानगर हे दोन्ही बोगदे नाशिक मुंबई महामार्गावर आहेत.सिडको आणि शहर यांना जोडणारे हे दोनही बोगदे आहेत .बोगद्याचा वरील बाजूस महामार्ग असून बोगदयांना समांतरही महामार्ग आणि दोन्ही बाजूस सव्हिसरोड आहेत.शहराच्या मुख्य दोन उपनगरांना जोडणारे हे बोगदे असल्याने सकाळ-संध्याकाळ या ठिकाणी वाहतुकीची मोठी कोंडी होत असते. तासनतास या बोगदे परिसरातील वाहतूकीच्या कोंडीत वाहने अडकून पडत असतात .यामुळे वेळेचा अपव्यय होऊन पेट्रोलची मोठी नासाडी होत असते. परिनामी वाहनधारकांची मोठी कुंचबना होत असते. या जाचातून वाहनधारकांची कायमचीच सुटका करण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून खासदार गोडसे प्रयत्नशील आहेत.
वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात अशा सूचना खासदार गोडसे यांनी नॅशनल हायवे प्रशासनाला दिले होत्या. राणेनगर, इंदिरानगर येथील बोगदे शिवारात वाहतुकीची कोंडी का होते याचे कारणे शोधण्यात आली असून यातूनच बोगद्यांची लांबी वाढवण्याचा निर्णय नॅशनल हायवे प्रशासनाने घेतला आहे.
आज मितीस दोन्ही ठिकाणच्या बोगद्याची लांबी 25 मीटर इतकी असून आता प्रत्येक बोगद्याच्या मागील आणि पुढील बाजूस साडेसात मीटर बोगद्याची लांबी वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक बोगद्याची लांबी आता 25 मीटरच्या ऐवजी 40 मीटर इतकी होणार आहे. या कामी सुमारे 40 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. खासदार गोडसे यांच्या सूचनेवरून नॅशनल हायवे प्रशासनाने याविषयीचा प्रस्ताव तयार केला आहे. खासदार गोडसे यांनी आज हा प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी केंद्र सरकारकडे सादर केला आहे.
MP Hemant Godse Proposal Indira Nagar Rane Nagar Underpass Length