नाशिक : नाशिक येथील मिलिटरी स्टेशनमुळे लष्कर हद्दीलगतच्या शून्य ते पाचशे मीटर अंतर परिसरातील प्लॉटवरील बांधकामाबाबत प्रशासनाने निर्बंध घातल्याने प्लॉटधारक त्रस्त झाले आहेत. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी नाशिक स्टेशनचा असंवेदनशील स्टेशनच्या यादीत समावेश होणे गरजेचे आहे. यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची विशेष भेट घेवून येथील प्लॉटधारकांना दिलासा देण्यासाठी नाशिक लष्कर स्टेशनचा असंवेदनशील स्टेशनच्या यादीत तातडीने समावेश करावा, अशी आग्रही मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे केली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून लष्कर आणि मनपा प्रशासनाने लष्कर हद्दीलगतच्या प्लॉटवर बांधकाम करण्याविषयी जाचक निर्बंध लादले आहेत. या अटींनुसार परिसरात शंभर मीटर अंतरापर्यंतचा प्लॉट धारकांना कोणत्याही प्रकारचे बांधकाम करता येणार नाही आहे. तसेच शंभर ते पाचशे मीटर अंतरापर्यंन्तच्या प्लॉट धारकांना केवळ १५ मीटर उंचीपर्यत बांधकाम करता येईल, अशी अट घातल्याने प्लाटधारक त्रस्त झाले आहेत. लष्कर आणि मनपा प्रशासनाच्या या बांधकाम मनाईच्या आदेशामुळे त्रस्त झालेल्या शेकडो प्लॉटधारकांनी खा. गोडसे यांची भेट घेत समस्यांचे ग्राऱ्हाणे मांडित शासनाच्या या चुकीच्या निर्णयाविरोधात संताप व्यक्त केला होता. खा. गोडसे यांनी प्लॉट धारकांच्या तक्रारींची गंभीर दखल घेत आज दिल्लीत केंद्रीयमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेत नागरिकांच्या समस्यांविषयी सविस्तर चर्चा केली.
लष्कर प्रशासनालगत हजारो एकर जमीन असून त्यातून अवघी २ ते ५ टक्के जमिनीवर बांधकाम झालेले आहेत. लष्करापासून शंभर मीटर पर्यंन्त अंतरावर सुमारे वीस हजार एकर जमीन आहे. यापैकी पन्नास टक्के जमीनीवरील प्लॉट विकसीत झालेले आहेत. लष्कर आणि मनपा प्रशासनाने बांधकामावर मनाई आणल्याने आज मितीस पन्नास टक्के जमीनीवरील प्लॉट पडून आहेत. प्लॉट धारकांना त्यावर बांधकाम करता येत नसल्याने प्लॉट धारकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे यावेळी खा. गोडसे यांनी केंद्रीयमंत्री राजनाथ सिंह यांच्या लक्षात आणून दिले. ज्यावेळेस नाशिक मनपाने शहर विकास आराखडा तयार केला त्यावेळेस बांधकामाच्या विषयाला कोणताही विरोध संरक्षण खात्याकडून करण्यात आलेला नव्हता हे ही खा. गोडसे यांनी या भेटीदरम्यान चर्चेत सांगून याबाबतच्या सर्व बाबी केंद्रीयमंत्री राजनाथ सिंह यांच्या निदर्शनात आणून दिल्यात. देशभरात १४५ संवेदनशील तर १५३ असंवेदनशील मिलटरी स्टेशन असून या दोन्हीही यादीत नाशिक लष्कर स्टेशनचा समावेश नसून प्लॉट धरकांना दिलासा देण्यासाठी नाशिक लष्कर स्टेशनचा समावेश तातडीने असंवेदनशील स्टेशनच्या यादीत करावा, अशी आग्रही मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी केली आहे.