खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रयत्नांना यश
नाशिक : द्वारका चौकातील वाहतुकीची कोंडी कायमस्वरुपी सुटावी, अपघातांना अळा बसावा तसेच भविष्यात द्वारका चौकात तसेच उपनगर, गांधीनगर, नेहरुनगर या ठिकाणाच्या महामार्गावर वाहतूक विस्कळीत होवू नये, यासाठी खासदार हेमंत गोडसे यांच्याकडून सुरु असणाऱ्या सततच्या पाठपुराव्याला यश आले आहे. द्वारका चौक ते दत्तमंदिर चौक दरम्यानाच्या सहा किलोमीटर रस्त्यावर उड्डाणपुल उभारणीसाठी या रस्त्याचे राष्ट्रीय महामार्गात समावेश करावा, अशी शिफारस राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने रस्ते वाहतूक आणी महामार्ग मंत्रालयाकडे केली आहे. प्राधिकरणाच्या या शिफारसीमुळे द्वारका – दत्तमंदिर चौक दरम्यान उड्डाणपुल उभारण्याचा मार्ग लवकरच मोकळा होणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे.
शहराच्या मध्यवस्तीत द्वारका चौक असून या चौकात मुंबई – आग्रारोड आणि नाशिक – पुणे या दोन महामार्गांचा संगम आहे. द्वारका येथून पुणेकडे जाणाऱ्या महामार्गावरुन नाशिकरोड, सिन्नर, शिर्डीकडे मोठ्या प्रमाणावर वाहने जातात. शहरातील सर्वात दाट वाहतुकीचा हा रस्ता आहे. परिणामी द्वारका चौक ते दत्तमंदिर सिग्नल या दरम्यानचा वाहतुकीचे सतत कोंडी होत असते. द्वारका चौकात वाहतुकीची सतत कोंडी होत असल्याने मुंबई आणि आग्राकडे नाशिक – पुणे महामार्गावरील जाणारी वाहतुकही सतत विस्कळीत होत असते. द्वारका चौकासह बोधलेनगर, गांधीनगर, उपनगर, नेहरुनगर परिसरातील वाहतुकीची कोंडी कायमची सुटावी, यासाठी खा. गोडसे यांनी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेत द्वारका चौकातील वाहतुकीचा प्रश्न किती गंभीर आहे, याचे महत्त्व पटवून दिले होते. दीड वर्षापूर्वी ना. नितीन गडकरी नाशिक शहरात एका कार्यक्रमासाठी आले असता द्वारका-दत्तमंदिर प्रस्तावित उड्डाणपुलाला गडकरी यांनी तत्त्वत: मान्यता देवून सुमारे पाचशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देणार असल्याचे स्पष्ट केले होते.
दरम्यानच्या काळात द्वारका – दत्तमंदिर उड्डाणपुलाच्या कामाचा सविस्तर अहवाल देखील तयार करण्यात आला होता. मात्र सदर रस्ता हा महानगरपालिका हद्दीत येत असल्याने कामासाठी निधी कोण देणार हा तांत्रिक मुद्दा निर्माण झाला होता. मनपाचे आर्थीक बजेट कमी असल्याने मनपा कडून या कामासाठी निधी मिळणे शक्य नव्हते. रस्ता मनपा हद्दीत असल्याने सार्वजनिक बांधकाम खात्याने निधी उपलब्ध करुन देण्यासाठी हात वर केले होते. यातून मार्ग काढण्यासाठी खा. गोडसे यांनी पुन्हा दिल्ली दरबारी प्रयत्न सुरु केले होते. सदर सहा रस्ता किलोमीटरचा रस्ता राष्ट्रीय महामार्गाकडे वर्गिकरण करुन निधी उपलब्ध करुन द्यावा, यासाठी खा. गोडसे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे पाठपुरावा सुरु केला होता. खा. गोडसे यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. प्राधिकरणाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत द्वारका – दत्तमंदिर रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्गीकरण करण्याची शिफारस रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडे केली आहे. नागपूर शहरात रस्ता, रस्त्याच्या वर उड्डाण पुल आणि त्यावर मेट्रो कार्यरत आहे. याच धर्तीवर द्वारका – दत्तमंदिर उड्डाण पुल या रस्त्यादरम्यान उड्डाण पुल आणि मेट्रोची संकल्पना प्रत्यक्षात येण्यासाठी मेट्रो प्रशासन आणि नॅशनल हायवे, यांनी एकत्रितपणे नियोजन करावे, अशा सूचना खासदार गोडसे यांनी दिल्या आहेत.