नाशिक – हज यात्रेसाठी उत्तर महाराष्ट्राचे मुख्य सेंटर म्हणून नाशिक येथे मिनी हाऊस व्हावे, तसेच मुबंई ऐवजी नाशिक येथून हज येथे जाणाऱ्या भाविकांना विमानसेवा उपलब्ध व्हावी, यासाठी नाशिक विमानतळाचा हज टर्मिनलच्या यादीत समावेश व्हावा, या मागणीविषयीच्या खा. हेमंत गोडसे यांच्या प्रयत्नांना यश येवू लागले आहे. नाशिक विमानतळाचा हज टर्मिनलच्या यादीत समावेश व्हावा यासाठीची विशेष शिफारस नुकतीच राज्याचे अल्पसंख्याक मंत्री यांनी नवाब मलिक यांनी केंद्रीय अल्पसंख्यांक व्यवहारमंत्री मुक्तार नक्वी यांच्याकडे केली आहे. दरम्यान खा. गोडसे यांनी आज दिल्लीत अल्पसंख्याक व्यवहार मंत्री मुक्तार नक्वी यांची भेट घेत उत्तर महाराष्ट्रातील हज यात्रेकरुंना न्याय देण्यासाठी नाशिक विमानतळाचा समावेश लवकरात लवकर हज टर्मिनलच्या यादीत करावा अशी आग्रही मागणी खा. गोडसे यांनी ना. नक्वी यांना केली आहे.
मुस्लिम बांधवांसाठी हज यात्रा ही एक पवित्र यात्रा आहे. तमाम मुस्लिम बांधवांच्या मनात हज यात्रेविषयी प्रचंड आस्था व आपुलकी आहे. हज यात्रेला जाण्यासाठी प्रत्येक मुस्लिम बांधव प्रयत्नशील असतो. हज यात्रेला जावू पुण्य पदरात पाडून घेणे प्रत्येक मुस्लिम बांधवाचे स्वप्न असते. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, नंदुरबार या जिल्ह्यातून दरवर्षी १२ ते १५ हजार मुस्लिम बांधव हज यात्रेसाठी जात असतात. यासाठीची प्रक्रिया राज्य शासनाने जरी ऑनलाईन केली असली तरी कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी हज भाविकांना मुंबई येथे तीन ते चार वेळा जावे लागते. कागदोपत्रांची पुतर्ता झाल्यानंतर भाविकांना मुंबई विमानतळावरुन हज यात्रेसाठी रवाना व्हावे लागते. यात पैसे आणि वेळाचा अपव्यय होत असल्याने हज भाविकांची मोठी कुचंबना होत आहे. याची दखल घेत नाशिक येथे मिनी हज हाऊस व्हावे आणि नाशिक विमानतळाचा हज टर्मिनलच्या यादीत समावेश व्हावा, यासाठी खा. गोडसे यांनी गेल्या काही महिन्यांपासून राज्य सरकारासह केंद्र सरकारकडे सतत पाठपुरावा सुरु केला आहे.
खा. गोडसे यांची मागणी न्यायिक असल्याने त्यांच्या मागणीची अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि अल्पसंख्याक विभागाच्या सेक्रेटरी जयश्री मुखर्जी यांनी दखल घेतली आहे. गेल्यावर्षी राज्यातून हज यात्रेसाठी राज्यभरातून सुमारे पंधरा हजार भाविक गेले होते. यापैकी तीन हजार भाविक एकट्या उत्तर महाराष्ट्रातून गेल्याची माहिती समोर आली आहे. यावरुन उत्तर महाराष्ट्रातून हज यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असल्याचे स्पष्ट झाले आहे. हज यात्रेला जाण्याकरिता भाविकांना मुंबईला ये-जा करावी लागत असल्याने यात्रेकरुंवर मोठ्याप्रमाणावर अतिरिक्त आर्थीक भार पडत असल्याने नाशिक विमानतळाचा हज टर्मिनलच्या यादीत समावेश करण्याची शिफारस राज्य सरकारने केंद्र सरकारला केली आहे. दरम्यान आज खा. गोडसे यांनी दिल्लीत अल्पसंक्याक व्यवहार मंत्री मुक्तार नक्वी यांची भेट घेतली. उत्तर महाराष्ट्रातील हज यात्रेकरुंना न्याय देण्यासाठी नाशिक विमानतळाचा समावेश लवकरात लवकर हज टर्मिनलच्या यादीत करावा अशी आग्रही मागणी खा. गोडसे यांनी ना. नक्वी यांना केली आहे. खा. गोडसे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे हज यात्रेविषयी होत असलेल्या या सकारात्मक घडोमोडींमुळे उत्तर महाराष्ट्रातील मुस्लिम बांधवांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.