मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ठाकरे गटाची तोफ समजल्या जाणाऱ्या सुषमा अंधारे गेल्या काही महिन्यांपासून फार्मात आहेत. त्यांची भाषणे, भाषणाची शैली आणि कुणावरही शाब्दिक हल्ला करण्याची हिंमत अधिकच चर्चेला असते. अलीकडेच त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट सवाल केला आहे.
देवेंद्र भाऊंचा गेम करणारा तो मित्र कोण आहे, असा सवाल त्यांनी केला आहे. त्यामुळे चांगलीच राजकीय चर्चा रंगत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्या फसवणुकीचा मुद्दा उपस्थित केला. अमृता यांची फसवणुक केल्याप्रकरणी अनिक्षा जयसिंघानी आणि तिचे वडील अनिल जयसिंघानी यांना अटक करण्यात आली आहे. त्यावर ही चर्चा रंगली. यावर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी फडणवीस यांनाच थेट प्रश्न केले आहेत.
‘फडणवीस असं म्हणतात की माझ्या मित्राने माझा गेम केला. पण उल्हासनगरला श्रीकांत शिंदेंच्या ऑफिसची जागा कुणाची आहे, हे एकदा किरीट सोमय्यांनी तपासून बघायला हवे. कागदपत्र कुणाची आहेत? खरेदी-विक्रीचा व्यवहार झाला की नाही? हे एकदा सोमय्यांनी समजून घ्यावे. आणि जर एवढी जवळीक अनिल जयसिंघानी आणि एकनाथ शिंदेंची असेल, तर फडणवीसांचा गेम करणारा मित्र कोण आहे? तो मित्र म्हणजे एकनाथ शिंदे आहेत का? असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला आहे. नांदेडच्या सभेत त्या बोलत होत्या.
हे कसं झालं?
‘उल्हासनगरच्या गोलमैदानात माझा भाचा श्रीकांत शिंदे याचं संपर्क कार्यालय आहे. ते कुणाच्या जागेत आहे हे एकदा देवेंद्रभाऊंनी तपासून पाहावं. श्रीकांत शिंदेचं संपर्क कार्यालय अनिल जयसिंघानीच्या जागेत आहे का? आणि असेल तर हे कसं झालं?’ असा प्रश्नही सुषमा अंधारेंनी केला आहे.
शिंदे-सिंघानिया संबंध
२०१५ साली अनिल जयसिंघानी शिवसेनेत यायचं ठरवलं होतं. उल्हासनगरमध्ये राहणारा माणूस म्हणजे ठाणे जिल्ह्याच्या हद्दीतला हा माणूस मातोश्रीपर्यंत येतो म्हणजे कुणीतरी वेळ घेतली असेल त्याच्यासाठी. ती वेळ घेणारे एकनाथ शिंदे होते. एकनाथ शिंदे आणि अनिल जयसिंघानी यांचे संबंध काय होते?, याचाही विचार करा.
MP Dr Shrikant Shinde Office in Anil Jaisinghani Land