नाशिक – राज्यासह नाशिक जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती, गारपीट, अतिवृष्टी शेतमालाला भाव नाही व त्यातच मागील एक वर्षापासून सुरु असलेल्या कोविड- १९ च्या साथीमुळे सर्वच शेतकरी कुटुंबियांवर कोसळलेले संकट अशा अनेक कारणामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. यामुळे शेतकरी वर्गाने घेतलेल्या कर्जाची वेळेत परत फेड करू शकला नसून ते थकीत आहेत. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने प्रसिद्धीस दिलेल्या थकबाकीदार शेतकऱ्यांच्या जमिनीचा लिलाव स्थगित करा अशी मागणी खासदार डॉ. भारती पवार यांनी जिल्हा बँकेत प्रशासकाबरोबर झालेल्या बैठकीत केली.
या बैठकीस नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रशासक आरिफ शेख, भाजपा भाजपा जिल्हाध्यक्ष केदा नाना आहेर,डॉ. गिरासे, बँकेचे मुख्याधिकारी पिंगळे यांचेसह बँक अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी खासदार डॅा. पवार म्हणाल्या की, शेतकऱ्यांचा शेतीवरच उदरनिर्वाह अवलंबून असून त्यांना दुसरा पर्याय नाही. आणि अशातच अधिच संकटात सापडलेल्या बळीराजाच्या शेतीचा लिलाव ऑनलाइन पद्धतीने करण्याचा घाट नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रशासनाने घेतलेला आहे. सदरच्या लिलावास राज्य शासनाने त्वरित स्थगिती द्यावी व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. असे खासदार पवार यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बैठकीत सांगितले. तसेच ज्या शेतकऱ्यांनी वेळेवर कर्ज परतफेड केली आहे ,ज्यांनी बँकेच्या नियमात बसून आपले कर्ज रक्कम अदा केली आहे अशा शेतकऱ्यांना तात्काळ कर्ज उपलब्ध करून द्यावे.
सदर बैठकीत आढावाही त्यांनी घेतला. यावेळी खरीप कर्ज ५३५ कोटी पैकी २२९ कोटी कर्ज वाटप झाले असल्याची माहिती देण्यात आली. यावेळी नॅशनल बँकेच्या धर्तीवर ओटीएस स्कीम राबवण्याची सूचना ही खा. पवार यांनी केली.