मुंबई – सतत धावपळीचे आयुष्य जगणाऱ्या आणि २४ तास कार्यकर्त्यांच्या गर्दीत राहणाऱ्या राजकीय नेत्यांना खासगी आयुष्य नसल्यासारखेच असते. अनेकांना आपण काय करत आहोत आणि पुढे काय करायचे आहे याचे चिंतन मनन करण्याची आवश्यकता भासते. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे सध्या अशाच भावनांच्या हिंदोळ्यावर हेलकावे खात आहेत. म्हणूनच ते म्हणतायेत, जरा विसावू या वळणावर…
खासदार अमोल कोल्हे सध्या खासदार असून ते राजकारणात चांगलेच सक्रिय असतात. अनेक राजकीय कार्यक्रम, सभा, मेळाव्यांमध्ये ते सहभाग नोंदवतात. नुकतेच थिएटर सुरू झाले आहेत. थिएटर सुरू करण्याच्या नियमांमध्ये बदल करावा अशी मागणी त्यांनी नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली होती. परंतु सध्या त्यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली असून ती शेअर केली आहे. आपल्याला चिंतनाची गरज असून, काही निर्णयांचा फेरविचार करणार असल्याचे ते सांगतात. त्यांच्या या पोस्टमुळे मात्र राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
फेसबुक पोस्टमध्ये काय
खासदार डॉ. कोल्हे आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहितात, ‘सिंहावलोकनाची वेळ – गेल्या काही दिवसांत, महिन्यांत, वर्षांत बेभान होऊन धावत राहिलो. काही टोकाचे निर्णय घेतले. अनपेक्षित पावलं उचलली. पण हे सगळं जुळवताना झालेली ओढाताण, तारेवरची कसरत, वेळेची गणितं, ताणतणाव यामुळे जरा थकवा आलाय. थोडा शारीरिक, बराचसा मानसिक थकवा आलाय. शारीरिक थकवा आरामाने निघून जाईल. पण मानसिक थकवा घालवण्यासाठी हवं थोडं मनन. थोडं चिंतन! घेतलेल्या निर्णयांचा विचार आणि कदाचित फेरविचार सुद्धा! त्यासाठीच एकांतवासात जातोय. काही काळ संपर्क होणार नाही. पुन्हा लवकरच भेटू…नव्या जोमाने, नव्या जोशाने’!
(टीप – फक्त चिंतनासाठी जातोय, चिंतन शिबिरासाठी नाही.)
डॉ. कोल्हे यांची फेसबुक पोस्ट अशी
https://www.facebook.com/photo.php?fbid=5166407500042409&set=a.336631773020030&type=3