इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – विकृती कुठल्याही नात्यात असू शकते. ज्याला वाईट कृत्य करायचं आहे, तो नात्यांचा, भावनांचा विचार करत नाही. मग ते आई-वडिल का असेना. आई-वडिलांनी पोटच्या पोरांचा निर्दयतेने खून करण्याच्या अनेक घटना आजवर देशात घडल्या आहेत. अश्याच एका घटनेत गुन्हा कबूल केल्यानंतर न्यायालयाने आई-वडील दोघांना जन्मठेप सुनावली आहे.
मध्यप्रदेशातील इंदोर येथील ही घटना असून २०१६ मध्ये पप्पू रावल आणि संगीता रावल यांनी आपल्या तीन महिन्याच्या मुलीची हत्या केली होती. मुलीच्या शरीरावर जन्मापासून असलेलं एक व्यंग सहन झालं नाही म्हणून त्यांनी हा प्रकार केला होता. दोघांनीही लेकीच्या डोक्यावर कैचीने वार केले आणि तिचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेह कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकून दिला होता. त्यानंतर दोघेही तिथून फरार झाले होते. पोलिसांनी बरेच दिवस दोघांचाही शोध घेतला.
काही दिवसांनी दोघेही सापडले आणि त्यांना अटक करण्यात आली. तेव्हापासून न्यायालयात या प्रकरणावर सुनावणी सुरू होती. विशेष म्हणजे अटक केल्यानंतर दोघांची कसून चौकशी करण्यात आली. त्यात त्यांनी गुन्हा कबुल केल्यामुळे प्रकरण पुढे लांबले नाही. पण न्यायालयीन प्रक्रिया बरेच दिवसांपासून सुरू आहे. अखेर दोघांना जन्मठेप सुनावून न्यायालयाने या घटनेबद्दल खंत व्यक्त केली. अश्याप्रकारचा गुन्हा करणाऱ्यांचा शेवट हाच होणार आहे, हे सिद्ध करणारी ही घटना आहे.
म्हणून दिली कबुली?
अटक झाल्यानंतर दोघांची चौकशी सुरू झाली. पण त्यातून गुन्हा केला आहे, याचा फक्त अंदाज येत होता. मात्र सिद्ध होत नव्हते. परंतु, पोलिसांनी दोघांची उलट तपासणी सुरू केल्यानंतर उत्तरांमध्ये विसंगती आढळली. त्यानंतर लगेच गुन्ह्याची कबुली दिली. आपणच आपल्या मुलीची हत्या केल्याचे आई-वडिलांनी मान्य केले आणि गुन्हा कबुल केला.
यासाठी केली हत्या
मुलीला जन्मापासूनच एक कान नसल्यामुळे रावल दाम्पत्याने तिची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अनेक मुलांच्या शरीरावर बालपणापासून व्यंग असतं, अनेकदा तर मुलं मतिमंदही निघतात. पण आई-वडिल त्यांना टाकून देत नाहीत अथवा मारून टाकत नाहीत. पण निर्दयी माय-बापांना नात्याचं काहीच महत्त्व नसतं.
MP Crime Mother Father Killed Daughter Court Sentence