नागपूर – शिवसेनेच्या वाशिम – यवतमाळ लोकसभा मतदार संघाच्या खासदार भावना गवळी यांच्या पाच संस्थेवर ईडीने थेट छापे टाकले आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी शंभर कोटी रुपयाच्या भ्रष्टाचाराचे आरोप करुन तक्रार केल्यानंतर ही कारवाई केल्याचे बोलले जात आहे. कालच ईडीने परिवहन मंत्री अनिल परब यांना नोटीस पाठवली होती. त्यामुळे सुडाच्या राजकारण सुरु झाल्याचे बोलले जात होते. पण, आज ईडीने नोटीस न देता थेट छापे टाकल्यामुळे खळबळ निर्माण झाली आहे. ईडीने टाकलेल्या छाप्यात वाशिक जिल्ह्यातील रिसोड उत्कर्ष प्रतिष्ठाण, बालाची सहकारी पार्टिकल बोर्ड, बीएमएस कॅालेज, भावना अॅग्रो पॅाडक्ट सर्व्हिस लि. या कंपन्यावर या पाच संस्थेचा समावेश आहे.
सोमय्या यांनी तक्रारी अगोदर वाशीमला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी सर्व माहिती जाणून घेतली. त्यावेळेस भावना गवळी यांच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड विरोध केला होता. त्यांच्यावर शाई फेकण्यात आली होती. ईडीबरोबर आरबीआयकडे सुध्दा सोमय्या यांनी तक्रार केल्याचे बोलले जात आहे.गवळी यांच्यावर १८ कोटी रोख रक्कम काढणे, कार्यालयात ७ कोटी रोख ठेवणे, बँकांना फसविणे आदी आरोप आहे. या छाप्यानंतर महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादीच्या नेत्यांनंतर आता शिवसेनेला टार्गेट केले जात आल्याचे समोर आले आहे. प्रताप सरनाईक, अनिल परब व आता भावना गवळी यांना लक्ष्य करण्यात आल्यामुळे शिवसेनेमध्ये प्रचंड संताप आहे.