नवी दिल्ली – एक पुजारी कोणत्याही जमीन तसेच मंदिराचा मालक असू शकत नाही. तो फक्त सेवकासारखे काम करतो. मंदिरातील संपत्तीचा मालक त्याचे देवच असतात, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. जमीन महसुलाच्या नोंदणीत पुजा-याची नावे जोडण्यासंदर्भातील याचिकेच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने हा ऐतिहासिक निर्णय सुनावला आहे.
न्यायाधीश हेमंत गुप्ता आणि ए. एस. बोपण्णा यांचे खंडपीठ म्हणाले, की पुजा-याकडे मंदिर किंवा मंदिराची मालमत्ता फक्त व्यवस्थापनासाठी असते. ते फक्त देवाच्या जागी त्या मंदिराचे काम करतात. देवाचे नाव कायद्याच्या संमतीत आहे. त्यामुळे जमीन महसुलाच्या नोंदणीत देवाच्याच नावाने मंदिराची मालमत्ता ठेवली जावी. तसेच जमीन महसुलाच्या नोंदणीतून पुजा-याची नावे काढण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. पुजारी त्या जमिनीची फक्त देखभाल करत असतात. ते भाडेकरूसारखेच असतात. मंदिरातील देवांची देखभाल ठेवण्यासह पुजारी तेथील जमिनीवर शेतीही करू शकतात, असेही न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे. मध्य प्रदेश सरकारच्या १९५९ च्या परिपत्रकाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. याच प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने परिपत्रक कायम ठेवले आहे. मंदिराची मालमत्ता अनधिकृतरित्या विक्री केली जाऊ नये. यासाठी पुजा-याची नावे जमीन महसूल नोंदणीतून हटविण्याचे आदेश परिपत्रकात दिले होते.