नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोण कधी कुणाची कशी फसवणूक करेल याचा काही नेम राहिलेला नाही. चित्रपटाचे ट्रेलर दाखवून एकाची कोट्यवधीने फसवणूक झाल्याचा आश्चर्यकारक प्रकार घडला आहे. नोएडा येथील प्रमोद नागर असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
प्रमोद आपल्या कंपनीच्या नावाने कार्यक्रम आयोजित करायचा. तिथे तो लोकांना काही चित्रपटांचे ट्रेलर दाखवायचा. त्यानंतर ११ महिन्यांत रक्कम दुप्पट करण्याचे लालूच तो लोकांना देत होता. लोकही त्याने दाखवलेल्या आमिषाला बळी पडून त्याच्या कंपनीत लाखो रुपये गुंतवायचे. जेव्हा गुतंवणूकदार त्याला ११ महिन्यांनंतर फोन करायचे, तेव्हा तो त्यांच्या फोनचे उत्तर नाही द्यायचा किंवा लोकांनी त्याच्याशी संपर्क साधू नये म्हणून नंबर बदलत होता.
दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे स्वॅग प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेडच्या विरोधात अनेकांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना कळले की स्वॅग प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी उदित ओबेरॉय, प्रमोद नागर ज्युनियर आणि प्रमोद नागर सीनियर यांनी फक्त लोकांची फसवणूक करण्यासाठी सुरु केली होती. यातील काही लोक स्वत:ला बनावट चित्रपट निर्मिती कंपनीचे दिग्दर्शक म्हणवून घेत होते. ते लोकांना त्याच्या कंपनीत गुंतवणूक करायला सांगायचे आणि ११ महिन्यांत दुप्पट पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवायचे.
४७ जणांची फसवणूक
प्राप्त माहितीनुसार, लोकांची फसवणूक करण्यासाठी हे लोक कार्यक्रम आयोजित करत होते. तिथे काही चित्रपटांचे ट्रेलर ते लोकांना दाखवायचे. ११ महिन्यांत रक्कम दुप्पट होईल असं म्हणता त्यांनी सुमारे ४७ जणांकडून ३ कोटी ५० लाख रुपये घेतले. या लोकांना सुरुवातीला काही दिवस रिटर्न मिळाले आणि त्यानंतर त्याला पैसे मिळणे बंद झाले तेव्हा लोकांना संशय आला. त्यांनी कंपनीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र कंपनीकडून त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
Movie Trailer Crore Cheating Noida Police