मुकुंद बाविस्कर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
भारतीय संस्कृतीत श्री गणराज तथा गणपतीचे वाहन म्हणून मूषकराज तथा उंदराला मानले जाते, परंतु वास्तवामध्ये उंदीर हा प्राणी फारसा कोणालाही आवडत नाही, असे दिसून येते. कारण तो शेतांमध्ये नव्हे तर घरांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान आणि घाण करत असल्याने सर्वांनाच तो आपला शत्रू वाटतो. परंतु आता आपल्याला ही मानसिकता बदलावी लागणार आहे. कारण हा उंदीर हा उपद्रवी प्राणी नसून तो मानवासाठी उपयुक्त ठरू शकतो, असा दावा दक्षिण आफ्रिकेतील शास्त्रज्ञांनी केला आहे.
कारण भूकंपासारख्या आपत्तीप्रसंगी जेव्हा मोठमोठ्या इमारती खाली माणसे अडकली जातात, तेव्हा प्रशिक्षित उंदरांच्या सहाय्याने नेमके किती माणसे अडकली आणि कुठे अडकली याचा शोध घेता येऊ शकतो. असे या शास्त्रज्ञांचे मत आहे. यासाठी काही उंदरांना प्रशिक्षण देण्यात आले असून त्यांच्या पाठीवर सूक्ष्म आणि अत्याधुनिक साहित्य बसून त्यांना जमिनीमध्ये खोलवर पाठविण्यात येत आहे. इतकेच नव्हे तर काही जातीचे उंदीर हे अत्यंत हुशार असल्याने त्यांना तीव्र वासाची संवेदना कळते त्यामुळे त्यांच्या सहाय्याने अनेक आजारांवर नियंत्रण मिळवणे शक्य होईल असाही विश्वास शास्त्रज्ञांना वाटतो
भूकंपाच्या वेळी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना वाचवणे बचाव पथकालाही कधी कधी अशक्य होते. पण आता हे काम शक्य करण्यासाठी शास्त्रज्ञांनी उंदरांची एक खास टीम तयार केली आहे. आपत्तीच्या वेळी ढिगाऱ्यात घुसणाऱ्यांनी गाडलेल्या नागरिकांची जागा शोधून त्याचा व्हिडिओ बनवून टीमला पाठवला जाईल.
टांझानियन शास्त्रज्ञ डॉ. डोना कीन यांनी अशी यंत्रणा तयार केली आहे, ती पिशवीच्या मदतीने या उंदरांच्या पाठीवर लोड केली जाईल. या बॅगेत मायक्रोफोन, व्हिडिओ डिव्हाइस आणि लोकेशन ट्रॅकर ठेवण्यात येणार आहे. या गोष्टींद्वारे बचाव कर्मचारी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांशी संपर्क साधू शकतील. याद्वारे, त्यांचे स्थान शोधून ते त्यांचे प्राण ही वाचवू शकतील. यासाठी आफ्रिकेतील शास्त्रज्ञ आणि अपोपो नावाची स्वंयसेवा संस्था उंदरांना प्रशिक्षण देण्याचे काम करत आहेत. या प्रकल्पासाठी आतापर्यंत सात उंदरांनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे. अवघ्या दोन आठवड्यांत या उंदरांनी हुशारीने सर्व काम शिकून घेतले आहे.
प्रशिक्षणासाठी निवडलेले हे उंदीर आफ्रिकेत आढळणाऱ्या पाऊच्ड रॅट्स प्रजातीतील आहेत. त्यांना ‘हिरो रॅट्स’ या नावाने संबोधले जाते.
इतर उंदरांच्या तुलनेत त्यांच्यात शिकण्याची आणि वास घेण्याची क्षमता अधिक असते. तसेच या प्रकल्पासाठी एकूण 170 उंदरांना प्रशिक्षण देण्यात येत असल्याचे डॉ.कीन यांनी सांगितले. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर, त्यांना शोध आणि बचाव पथकासोबत काम करण्यासाठी तुर्कीला पाठवले जाईल. जिथून अनेकदा भूकंपाच्या घटना समोर येतात.
दरम्यान, डॉ.कीन म्हणतात की, उंदरांचे नाव मानसाने विनाकारण बदनाम केले आहे. काही जण त्यांना घाण पसरवणारे प्राणी समजतात, पण उंदीर खूप हुशार असतात. जलद गतीने नवीन कौशल्ये शिकून ते सर्वांना आश्चर्यचकित करू शकतात. सध्या हिरो रॅट्स केवळ भूकंपच नव्हे तर वासाने टीबी आणि ब्रुसेलोसिस सारखे आजार शोधण्याचे प्रशिक्षण घेत आहेत.